BSF : पाकिस्तानी नागरिकाची पंजाबमध्ये घुसखोरी; बीएसएफने घेतले ताब्यात

गुरदासपूर : भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी शिताफीने पकडले. ती कारवाई पंजाबमध्ये करण्यात आली. पंजाबमध्ये सीमेलगत तैनात असणाऱ्या बीएसएफच्या जवानांनी रात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाल हेरली. एका व्यक्तीने भारतीय हद्दीत २५० मीटर आतपर्यंत शिरकाव केल्याचे त्यांना आढळले.
जवानांना पाहून घुसखोर संबंधित भागातील झुडूपांमध्ये दडला. त्या भागाला घेराव घालून जवानांनी त्याला पकडले. बीएसएफच्या चौकीत त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. घुसखोर पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. हसनैन (वय २४) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे काही पाकिस्तानी चलन आणि ओळखपत्र आढळले. सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.
अशात पाकिस्तानी नागरिकाने केलेली घुसखोरी भारतीय सुरक्षा आणि तपास यंत्रणांनी अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यातून विविध यंत्रणांकडून हसनैनची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. याआधी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी रेंजर्सनी अनावधानाने सीमा ओलांडलेल्या एका बीएसएफ जवानाला ताब्यात घेतले. त्याच्या सुटकेसाठीच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. अशात नुकताच एक पाकिस्तानी रेंजर राजस्थानमध्ये बीएसएफच्या जाळ्यात आला. त्यापाठोपाठ बीएसएफने पाकिस्तानी नागरिकालाही पकडले आहे.





