इस्त्रायलशी जवळीक साधण्याचे पाकचे छुपे प्रयत्न? पॅलेस्टाईनला सोडले वाऱ्यावर, देशांतर्गतही नाराजी

जेरूसलेम – पाकिस्तान आणि इस्रायलमधील संबंध नेहमीच कटु राहिले आहेत. विशेषतःच्या मुद्द्यावर दोन्ही देशांचे विचार पूर्णपणे विरुद्ध आहेत. पाकिस्तानने नेहमीच पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याचा जाहीर दावा केला आहे, परंतु अलीकडील घटनांवरून पाकिस्तानची खरी भूमिका काय आहे हे उघड झाले आहे. गाझाच्या मुस्लिमांविरुद्ध पाकिस्तानची इस्रायलशी गुप्तपणे वाढती जवळीक अधोरेखित झाली असून ही पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी धक्कादायक ठरते आहे.
यासंदर्भात उदाहरण देताना सांगण्यात आले की अलीकडे ११ पाकिस्तानी पत्रकारांनी इस्रायलला भेट दिली होती. या भेटीमुळे पाकिस्तानच्या दुटप्पीपणाचे हे प्रकरण अधिक स्पष्ट होते. पाकिस्तानी पत्रकार एका एनजीओच्या माध्यमातून इस्रायलला गेले होते आणि त्यांनी हमासच्या सैनिकांनी इस्त्रायलमध्ये जिथे बॉम्ब टाकले होते त्या ठिकाणांनाही त्यांनी भेट दिली. यावेळी, पाकिस्तानी पत्रकारांनी इस्रायली सरकारला पॅलेस्टाईनबद्दलची भूमिका बदलण्याचे आवाहनही केले.
तथापि, जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार पत्रकारांनी इस्त्रायलचे खूप कौतुक केले. या घटनेने संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने इस्रायलचे कौतुक करून त्यांच्याशी मूक करार केला आहे का असे प्रश्न या भेटीमुळे पाकिस्तानात उपस्थित झाले आहेत.
पाकिस्तान सरकारने दिले स्पष्टीकरण
पत्रकारांच्या इस्रायल भेटीबाबत पाकिस्तान सरकारने स्पष्टीकरण दिले होते, परंतु हे स्पष्टीकरण केवळ एक खोटारडेपणा असल्याचेच सिद्ध झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की या प्रकरणाची चौकशी केली जात आहे, परंतु प्रश्न असा निर्माण होतो की या पत्रकारांवर कारवाई का केली गेली नाही. त्याचे कारण यापूर्वी एका पाकिस्तानी पत्रकाराला परवानगीशिवाय इस्रायलला गेल्यामुळे नोकरी गमवावी लागली होती. तसे आता झालेले नाही. याचा सरळ अर्थ असा की हे पत्रकार सरकारच्या परवानगीशिवाय इस्रायलला जाऊ शकत नाहीत. यावेळी एक-दोन नाही तर चक्क ११ पत्रकार इस्त्रायलला गेले.
या संपूर्ण घटनेकडे पाहता, हे स्पष्ट होते की पाकिस्तान सरकार पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याचा केवळ आव आणत आहे, परंतु प्रत्यक्षात ते इस्रायलशी मूक राजकीय करार करण्यात गुंतलेले आहे. अमेरिकेकडून थांबवलेल्या आर्थिक मदतीच्या संकटापासून वाचण्यासाठी, पाकिस्तानने इस्रायलशी जवळीक साधण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या दबावाला तोंड देण्यास मदत होईल असे मानले जाते आहे. पाकिस्तानला देण्यात येणारी अमेरिकन मदत पूर्णपणे थांबली आहे आणि हे पाकिस्तानसाठी एक मोठे आर्थिक संकट बनले आहे.





