Pune News : भुकूम मध्ये सोसायटीत आढळली पाकिस्तानी चलनातील नोट; NDA नजीकच्या परिसरातील घटना

पुणे : मुळशी तालुक्यातील भुकूम येथील स्काय आय मानस लेक सिटी मधील आयरिस 3 या सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर पाकिस्तानी चलना मधील नोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. ज्या सोसायटीमध्ये ही नोट आढळली आहे, ती सोसायटी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या हदीपासून अगदी काही मीटर अंतरावरच आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांनी बावधन पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला असून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी सोसायटीच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने पोलिसांना केली आहे. सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर ही नोट पडलेली असल्याचे सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने लगेच बावधन येथील पोलिसांना संपर्क करून त्या ठिकाणी जाऊन अर्ज दिला आहे.
पोलिसांनी या बाबतचा तपास सखोल करणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. पाकिस्तानी चलनातील सापडलेली नोट ही वापरातील असून ती अनेक वेळा वापरली असल्याचे तिच्या एकूण स्थितीवरून दिसते.
ही नोट या सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर कोणाच्या खिशातून पडली ती आपल्या देशामध्ये कोणाकडून आली, तिचा वापर कोण करत होते, पाकिस्तान मधून भारतामध्ये या नोटा कोण घेऊन आले, या सगळ्या गोष्टींचा तपास उच्च स्तरावर होणे गरजेचे आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सोसायटी कडून घेण्यात यावे, तसेच सोसायटीमध्ये पाकिस्तान मधून कोण राहिला आलेले आहे, याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ही बाब अतिशय गंभीर असून याकडे पोलिसांनी अतिशय गांभीर्याने लक्ष देऊन सखोल तपास करण्याची आवश्यकता आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यामुळे या ठिकाणी अनेक बाहेरील लोक राहिला आलेले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानामधून कोण राहिला आलय हे समजणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- या सोसायटीमध्ये पाकिस्तान मधून कोण राहिला आले आहे याचा तपास करणे गरजेचे आहे.
- राहिला आलेला माणूस कोणत्या उद्देशाने या ठिकाणी राहिला आला आहे.
- मानस लेख सोसायटी पासून काही मीटर अंतरावर नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे.
- राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे.
- भविष्यामध्ये काही धोका आहे का हे सगळे तपासणे गरजेचे आहे.





