पठाणकोटमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे पोस्टर; सरकारी कार्यालये उडवण्याची धमकी

चंदीगड – पठाणकोटमध्ये विविध ठिकाणी संशयास्पद दृश्ये आढळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात काही समाजविघातक लोक याचा गैरफायदा घेत अधिक दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पठाणकोटच्या ढाकी रोडवरही अशीच एक घटना पाहायला मिळाली, जिथे काही अज्ञातांनी पाकिस्तान जिंदाबादचे पोस्टर टाकल्याचे दिसून आले, ज्यावर सरकारी कार्यालय उडवण्याबरोबरच इतर अनेक ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात येणार असल्याचे लिहिले आहे.
समाजकंटकांनी एका कारच्या काचाही फोडल्या. सकाळी चार जणांनी कारची काच फोडून घटनास्थळावरून पळ काढत असताना एका व्यक्तीने त्यांना पाहिले असता स्थानिकांना हा प्रकार समजला. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला.
स्थानिक नागरिक रमेश कुमार यांनी सांगितले की, काही लोक दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सांगितले की, सकाळी त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडल्याचा आवाज आला आणि जेव्हा त्यांनी गच्चीवरून पाहिले तेव्हा त्यांना चार लोक धावताना दिसले,
ज्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच पाकिस्तान जिंदाबादची पोस्टर फेकणारांचाही शोध घेतला जात आहे.





