India Vs Pakistan – पाकिस्तानकडून जगभर दहशतवाद पसरवला जातो आहे. भारताविरोधात सीमेपलिकडून दहशतवाद पसरवला जाण्याचे परिणाम पाकिस्तानलाच भोगायला लागतील, हे देखील पाकिस्तानला लक्षात येईल, अशा खरमरीत शब्दात संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये भारताने पाकिस्तानला सुनावले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी महासभेच्या ७९ व्या सत्रात जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला राईट ऑफ रिप्लाय अंतर्गत आज संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या कायम दूतावासामधील प्रथम सचिव भाविका मंगलानंदन यांनी हे प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून शेजारी देशांविरोधात सीमापार दहशतवादाचा एक शस्त्र म्हणून वापर केला जातो आहे, हे जगाला माहीती आहे. भारताच्या संसदेवर, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर, बाजारांमध्ये आणि तीर्थस्थळांवरही पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी हल्ले केले गेले आहेत. अशा हल्ल्यांची यादी फार मोठी आहे.. अशा देशाने अन्यत्र होणाऱ्या हिंसाचाराबद्दल बोलणे हे सर्वात वाईट दुटप्पीपणा आहे, असे मंगलानंदन म्हणाल्या. शाहबाज शरीफ यांनी अपेक्षेप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताना स्थायी शांततेसाठी आणि शांततामय तोडग्यासाठी भारताने पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम लागू केले पाहिजे आणि चर्चेची प्रक्रिया सुरू केली पाहिजे, अशी अपेक्षा केली होती. भारताने परस्पर सामरिक संयमासाठी पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारला असल्याचेही ते म्हणाले होते. त्यासंदर्भात बोलताना दहशतवादाशी कोणताही संबंध असू शकत नाही. किंबहुना, भारताविरुद्ध सीमेपलीकडील दहशतवाद अपरिहार्यपणे परिणामांना आमंत्रण देईल, हे पाकिस्तानने लक्षात घेतले पाहिजे, असेही मंगलानंदन यांनी सुनावले. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानने दीर्घकाळ आश्रय दिला होता. याची जगाने आठवण ठेवावी. जगभरातील दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानच्या बोटांचे ठसे आहेत. पाकिस्तानच्या धोरणांमुळे दहशतवादी कारवायांचे घर आपल्या देशात निर्माण होण्याची भीती जगभरातील अनेक देशांना वाटू लागली आहे. या देशांच्या पंतप्रधानांकडून पोकळ गप्पा मारल्या जाण्याचे काही आश्चर्य नाही. मात्र ही वक्तव्ये आपणा सर्वांसाठी अमान्य आहेत, हे आपल्याला समजायला हवे. सत्याचा मुकाबला असत्याने केला जाऊ शकत नाही. पुन्हा पुन्हा असत्य सांगण्याने काहीही फरक पडणार नाही. आमची भूमिका स्पष्ट आणि अपरिवर्तनीय आहे, असेही त्या म्हणाल्या. ज्या देशात निवडणुकांमधील गैरव्यवहाराचा इतिहास आहे, त्या देशाने राजकीय निवडीबद्दल आणि लोकशाहीबद्दल बोलू नये. खरे तर पाकिस्तानने भारताची भूमी व्यापली आहे. भारताचा अविभाज्य आणि अपरिवर्तनीय भाग असलेल्या जम्मू काश्मीरमधील निवडणुकांमध्ये दहशतवादाद्वारे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या देशाने १९७१ मध्ये अल्पसंख्यांकांचा नरसंहार केला त्या देशाने असहिष्णूता आणि फोबियाबद्दल बोलणे हास्यास्पद आहे, असेही मंगलानंदन म्हणाल्या.