सौदीच्या युवराजांचा पाक दौरा लांबणीवर

इस्लामाबाद – सौदी अरेबियाचे युवराज मुहम्मद बिन सलमान यांचा बहुप्रतिक्षित पाकिस्तान दौरा लांबणीवर टाकण्यात आला आहे. अनिश्चित कारणासाठी हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, असे पाकिस्तानच्या माध्यमांनी जाहीर केले. सौदीचे युवराज १९ मे रोजी पाकिस्तानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे आगोदर निश्चित करण्यात आले होते.
मात्र हा दौरा पुढे ढकलला गेला आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर या दौऱ्याचे सुधारीत वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झेहरा बलोच यांनी सांगितले.
पाकिस्तानची जनता सौदीच्या सर्वोच्च नेत्याच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. त्यामुळे हा दौरा लवकरच निश्चित केला जाईल, असा विश्वास बलोच यांनी व्यक्त केला. मात्र हा दौरा पुढे का ढकलण्यात आला हे जाहीर केले गेलेले नाही.
हे नियोजन करण्यासाठी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दर सौदीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. सौदीच्या युवराजांच्या दौऱ्याबद्दलचे वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दल स्पष्टिकरण दिले.
पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून विविध क्षेत्रांमधील ५ अब्ज डॉलरच्या गुंतचवणुकीची अपेक्षा असल्यामुळे या दौऱ्याबद्दल पाकिस्तानला खूप अपेक्षा आहेत. सौदीचे युवराज मुहम्मद बिन सलमान यापूर्वी २०१९ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. २०२२ मध्येही त्यांचा पाक दौरा ठरला होता. मात्र ऐनवेळी तो रद्द करण्यात आला होता.





