इस्लामाबाद – पाकिस्तानमधील एका विद्यापीठात मुली तसेच महिला शिक्षिकांना टाईट जिन्स घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, विद्यापीठात प्रवेश करताच विद्यार्थीनींना स्कार्फ म्हणजेच हिजाब घालणे बंधनकारक केले आहे. विद्यापीठाच्या या नियमामुळे पाकिस्तानमध्ये काही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानमधील खैबरपख्तुनवा प्रांतातील बाचा खान विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एक ड्रेस कोड निश्चित केला आहे. विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार विद्यापीठात शिकत असलेल्या मुलींना टाइट जीन्स, टी-शर्ट, छोटे कपड़े, मेकअप, दागीने, फॅन्सी पर्स, पारदर्शी कपड़े तसेच हायहिल्स घालण्यास बंदी घातली आहे.
पाकिस्तानच्या या विद्यापीठाने लागू केलेले नियम फक्त विद्यार्थिनींसाठीच नाहीत. तर विद्यापीठात शिकवत असलेल्या शिक्षिकांनासुद्धा काही नियम पाळावे लागणार आहेत. नव्या नियमांनुसार महिला शिक्षिकांना सॅन्डल, इयररिंग्स, जीन्स घालण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच हा नवा नियम लागू झाल्यानंतर महिला शिक्षिका शॉर्ट स्कर्टसुद्धा घालू शकणार नाहीत.
फक्त मुलींसाठीच नियम बदलले असे नाही. तर मुलांसाठीसुद्धा अनेक नियम कडक करण्यात आले आहेत. मुलांना निळा, काळ्या रंगाची पॅन्ट, कोट आणि जॅकेट, शॉर्ट, कटऑफ जीन्स, टाइट जीन्स, स्पोर्ट्स शूज, हातांवर बॅंड घालण्यास मनाई करण्यात आली आहे.