पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar : काल मध्यरात्री भारताने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने मध्यरात्री पाकिस्तानी तळांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले. हे दहशतवादी अड्डे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होते.
या हवाई हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. या अॅापरेशनचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या एक्स या अकाऊंटवरून प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सैन्यदलांची ताकद, राजकीय इच्छाशक्ती आणि देशवासीयांची एकता म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’..! असे अजित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल अजित पवार यांनी भारतीय वायुसेना, नौसेना यांचे अभिनंदन केले. तसेच भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीने त्यांच्यामागे उभा आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने पुन्हा सिद्ध केले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
भारतानं दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून ते नष्ट केल्याबद्दल मी भारतीय वायुसेना, नौसेना, थलसेनेच्या नेतृत्वाचं आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो.
भारताने आज भल्या पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून नियोजनबद्ध, अचूक हल्ले करत दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं. या कारवाईत नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीने कारवाई होत राहील, हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत, असे देखील अजित पवार म्हणाले. तसेच त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे देखील आभार मानले.
सैन्यदलांची ताकद, राजकीय इच्छाशक्ती आणि देशवासीयांची एकता म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’..!
भारतानं दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून ते नष्ट…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 7, 2025
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या हल्ल्यानं संपूर्ण देश संतप्त होता. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी घेतली होती, असे देखील अजित पवार म्हणाले.





