मला अटक करण्यात आलेली नाही; राहत फतेह अली खान यांनी व्हिडिओ शेअर करत दिले स्पष्टीकरण

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना अटक करण्यात आली असल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यांनी दिलं होतं. मात्र राहत फतेह अली खान यांनी इंस्टाग्रामला व्हिडीओ शेअर करत हे वृत्त खोटं असल्याचं म्हणत या वृत्ताचे खंडन केले आहे. दुबई विमानतळावरुन त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या असल्याचं पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटलं होतं. राहत फतेह अली खान यांचा माजी मॅनेजर सलमान अहमदने केलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असल्याचंही सांगण्यात आलं होतं.
राहत फतेह अली खान यांनी आरोपांचे केले खंडन
राहत फतेह अली खान आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी संयुक्त अरब अमिराती येथे आहेत. राहत फतेह अली खान यांनी इंस्टाग्रामला व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. राहत फतेह अली खान यांच्या अटकेसंदर्भातील वृत्त खोटं आणि आधार नसणारं आहे असं कॅप्शन पोस्टला दिलं आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये ?
ते म्हणत आहेत की, “मी दुबईत माझी गाणी रेकॉर्ड करण्यासाठी आलो आहे. आमची गाणी चांगली असून, चांगलं काम करत आहोत. सगळं काही ठीक आहे. तुम्ही घाणेरड्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं. शत्रू पसरवत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका”.





