Pakistan : धक्कादायक ! पाकमध्ये जमावाने एकास जिवंत जाळले

Pakistan – पाकिस्तानमध्ये धर्माच्या नावाखाली अराजकतेची आणखी एक घटना समोर आली आहे. एका संशयिताला जमावाने पोलीस स्टेशनमधून बाहेर नेउन त्याला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यातील मद्यान भागात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्वात जिल्ह्याचे डीपीओ डॉ.जाहिदुल्ला खान यांनी सांगितले की, या कोलाहलात 8 जण जखमीही झाले आहेत. कुराणच्या कथित अपमानाच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला जमावापासून वाचवले होते. त्याला पोलिस ठाण्यात नेले होते, परंतु जमावाने पोलिस स्टेशनवर हल्ला केला आणि संशयिताला सोबत नेले.
जमावाने पोलीस ठाणे आणि पोलीस ठाण्यात उभी असलेली वाहने पेटवून दिल्याचे डीपीओने सांगितले. याशिवाय कथित आरोपीलाही जाळण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, संपूर्ण प्रकरण अद्याप समोर आलेले नाही.
या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रस्त्यावर पडलेल्या मृतदेहाला जमावाने आग लावल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक जमाव पोलिस स्टेशनच्या बाहेर गोंधळ घालताना दिसत आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मद्यानमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. माद्यान हे स्वात खोऱ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की केपीचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी प्रांताच्या पोलिसांशी बोलून या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले आहे. अहवाल मागवताना त्यांनी पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.





