इस्लामाबाद – भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या लष्कराबाबत केलेल्या टिप्पणीवरून पाकिस्तानने थयथयाट केला आहे. पाकिस्तानचे सशस्त्र दलासह इतर संस्था देशाच्या सुरक्षेचे स्तंभ असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाक लष्कर आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. भारताच्या समस्यांचे मूळ पाक लष्करातूनच उगम पावले आहे, असे जयशंकर म्हणाले होते. पाक लष्कराचा दहशतवादाला पाठिंबा असल्याचा उल्लेखही त्यांनी केला होता. ज्याप्रमाणे काही चांगले दहशतवादी असतात आणि काही वाईट दहशतवादी असतात, त्याच प्रमाणे काही चांगले लष्करी अधिकारी असतात पण काही तितकेसे चांगले नसतात, असे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या संदर्भाने बोलताना जयशंकर म्हणाले होते. जयशंकर यांची ही उपरोधिक टीका प्रक्षोभक, बिनबुडाची आणि बेजबाबदारपणाची असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर आंद्रबी यांनी म्हटले आहे. पाकिस्तान एक जबाबदार राष्ट्र आहे आणि सशस्त्र दलांसह त्याच्या सर्व संस्था राष्ट्रीय सुरक्षेचा आधारस्तंभ आहेत, असे अंद्राबी म्हणाले. मे महिन्यात झालेल्या संघर्षातून पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही आक्रमणाविरुद्ध योग्य, प्रभावी पण जबाबदारीने देशाचे रक्षण करण्याचा दृढनिश्चय दर्शविला. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे पाकिस्तानच्या सरकारी संस्था आणि त्यांच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रचार मोहिमेचा भाग आहे, असेही ते म्हणाले.