Pakistan warning : दहशतवादावरून पाककडून अफगाणिस्तानला इशारा
पाकिस्तानला चर्चेद्वारे तणाव दूर करण्याची इच्छाच नसल्याचा आरोप अफगाण तालिबानचा प्रवक्ता झबिबुल्लाह मुजाहिदीन याने पाकिस्तानवर केला होता.

Pakistan warning – सीमापार दहशतवादाच्या धोक्याला उत्तर देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, अशा शब्दात पाकिस्तानने अफगाणिस्तानला इशारा दिला आहे. दहशतवाद ही एक लाल रेषा असून तालिबानी राजवटीकडून राष्ट्रीय सुरक्षेला ओलीस ठेवता येणार नाही, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.
पाकच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी रात्री यासंदर्भात एक कडक शब्दातले निवेदन प्रसिद्धीस दिले आणि अफगाण तालिबानच्या नेतृत्वावर दहशतवाद्यांवर अफगाणी भूमीवरील दहशतवादावर कारवाई करण्यास नकार देण्याचा आणि त्याऐवजी द्विपक्षीय संबंध खालावण्यासाठी पाकिस्तानलाच जबाबदार धरण्याचा आरोपही केला.
तालिबानी राजवटीची दिशाभूल करणारी मानसिकता आणि द्विपक्षीय संबंध खालावण्यामागील मूळ कारणाचा सामना करण्याची अनिच्छा अफगाण तालिबानच्या प्रवक्त्याने उघड केल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
पाकिस्तानला चर्चेद्वारे तणाव दूर करण्याची इच्छाच नसल्याचा आरोप अफगाण तालिबानचा प्रवक्ता झबिबुल्लाह मुजाहिदीन याने पाकिस्तानवर केला होता.
मतभेदांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी पाकिस्तानकडे आवश्यक तयारी नाही आणि पाकिस्तानची चुकीची धोरणे संघर्षाच्या निराकरणात अडथळा आणत असल्याचा आरोपही त्याने केला होता.
अफगाणिस्तानने आपल्या भूमीवरून होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरोधात कृती केली नाही, तर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा अधिकार पाकिस्तानला असल्याचा इशाराही पाकिस्तानने दिला आहे.





