Pakistan: इम्रान खान यांच्या राजकीय भवितव्याला मोठा धक्का; लष्कराने घेतली कठोर भूमिका

इस्लामाबाद – देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत कोणताही करार होण्याची शक्यता पाकिस्तानी लष्कराने फेटाळून लावली आहे. लष्कराची ही भूमिका इम्रान खान यांच्या राजकीय भवितव्याला मोठा धक्का आहे. माजी पंतप्रधान देशाच्या शक्तिशाली लष्करी आस्थापनेशी मागील बाजूने चर्चा करण्याचा प्रयत्न करीत होते.
एका ब्रिटीश दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे संस्थापक असलेल्या इम्रान खान यांनी (पीटीआय) रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली होती. त्यात त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तथापि, इम्रान खान यांच्याशी कोणत्याही स्तरावर चर्चा करण्याचा विचार लष्कराने फेटाळून लावला आहे.
देशाच्या लष्करी आस्थापनेशी तडजोड करण्यास आपण अजूनही तयार असल्याचे खान यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे इम्रान खान यांनी यापूर्वी लष्कर आणि लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनाच त्यांची सद्यस्थिती आणि तुरुंगवासासाठी जबाबदार धरले होते. खान यांनी लष्करावर अमेरिकन सरकारशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला होता.
पाकिस्तानी लष्कराच्या सूत्राने सांगितले की, खान यांच्यावर न्यायालयीन खटले सुरू आहेत आणि ते लष्कराकडून कोणत्याही कराराची अपेक्षा करू शकत नाहीत. सर्वांनी कायद्याचे नियम पाळावेत, अशी त्यांची इच्छा आहे, पण ते स्वत: तसे करत नाहीत आणि लष्कराशी चर्चेसाठी दबाव टाकत आहेत. आपली सुटका सुनिश्चित करण्यासाठी तडजोड करण्याची मागणी करत त्यांनी बिनशर्त चर्चेचीही ऑफर दिली होती.





