Pakistan : पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती कायम; सलग तिसऱ्यांदा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

Pakistan Army – भारताबरोबरचा तणाव शिगेला पोहचल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने कुरापती सुरू केल्या आहेत. पाकिस्तानी सैनिकांनी सलग तिसऱ्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या विविध भागांत नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत गोळीबार केला.
त्या माऱ्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय लष्कराने अवलंबले आहे. सुदैवाने, पाकिस्तानी माऱ्यात भारतीय बाजूची कुठलीही हानी झालेली नाही. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला.
त्यातून त्या देशाची कोंडी करण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यातून त्या देशाच्या सैनिकांनी एलओसीलगत शस्त्रसंधी उल्लंघनाचे सत्र आरंभले आहे. मात्र, चोख प्रत्युत्तर देऊन भारतीय जवान कुरापती उधळून लावण्यास सज्ज असल्याचा संदेश पाकिस्तानला देत आहेत.





