Pakistan-Afghanistan War : सणासाठी थांबले युद्धाचे रणांगण.! ईदनिमित्ताने तीन दिवसांच्या युद्धविरामाची केली घोषणा
पवित्र 'ईद-उल-फित्र' सणाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातील तणावपूर्ण सीमाभागात शांततेची चिन्हे दिसत आहेत.

Pakistan-Afghanistan War : पवित्र ‘ईद-उल-फित्र’ सणाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातील तणावपूर्ण सीमाभागात शांततेची चिन्हे दिसत आहेत. पाकिस्तानमध्ये प्रतिबंधित असलेल्या ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या दहशतवादी संघटनेने गुरुवारी पहाटे तीन दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली. याआधी बुधवारीच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैन्यानेही तात्पुरती शस्त्रसंधी जाहीर केली होती.
टीटीपीचे प्रवक्ता मोहम्मद खुरासानी याने स्पष्ट केले की, रमजान महिन्याची सांगता आणि ईदचा सण नागरिकांना शांततेत साजरा करता यावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही शस्त्रसंधी ईदच्या पहिल्या दिवसापासून लागू होईल.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि कतार या देशांनी महत्त्वाची मध्यस्थी केली आहे. या देशांच्या विनंतीवरून दोन्ही बाजूंनी सोमवार रात्रीपर्यंत युद्धविराम पाळण्याचे मान्य केले आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून उभय देशांच्या सीमेवर चकमकी भडकल्या होत्या. पाकिस्तानचा आरोप आहे की, अफगाण तालिबान सरकार टीटीपीच्या नेत्यांना आश्रय देते, जेथून पाकिस्तानवर हल्ले केले जातात. मात्र, काबूलने नेहमीच हे आरोप फेटाळून लावले आहेत.
फेब्रुवारीनंतर प्रथमच सीमेवर शांतता अनुभवण्यास मिळत आहे. ऑक्टोबरमध्येही अशाच प्रकारे मध्यस्थीद्वारे युद्धविराम घडवून आणण्यात आला होता. या तात्पुरत्या विश्रांतीमुळे सीमेवरील तणाव कायमस्वरूपी निवळणार का, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.






