पाकिस्तान : हिंदू मंदिरावर हल्ला करणाऱ्या 20 जणांना अटक

लाहोर – पाकिस्तानातील पंजाब प्रांतात हिंदू मंदिरांवर हल्ला केल्याच्या कारणावरून पोलिसांनी दीडशे जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यातील 20 जणांना अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानातील रहिमयार खान जिल्ह्यातील भोंग गावात असलेल्या मंदिरावर शेकडो लोकांच्या एका समूहाने लाठ्याकाठ्यांसह हल्ला करून तेथील मूर्ती फोडून टाकल्या होत्या. तरीही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांवर तीव्र ताशरे मारले.
अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची प्रतिमा मलिन होत आहे असे नमूद करीत सुप्रीम कोर्टाने या हल्लेखोरांवर कारवाईचा आदेश दिला होता. या प्रकरणाचे व्हिडिओ फूटेज तपासून अन्यही संबंधितांना लवकरच अटक केली जाईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. मंदिराचे पाडण्यात आलेले बांधकामही पुन्हा पूर्ववत केले जात आहे असेहीं पोलिसांनी नमूद केले.





