PAK vs BAN 1st Test (Day 1 Stumps) : खराब सुरुवातीनंतर आयुब-शकीलने सावरला डाव; पाकच्या दिवसअखेर….

Bangladesh vs Pakistan 1st Test Day 1 Stumps :- सकाळपासून सुरु झालेल्या पावसाने उशीराने सुरु झालेल्या लढतीमध्ये बांगलादेश संघाने नवीन चेंडूचा सुरेख वापर करताना पाकिस्तानची आघाडीची फळी उध्वस्त केली. त्यानंतर मात्र सैम अयुब व सौद शकील यांनी केलेल्या 65 धावांच्या भागीदारीने दिवसअखेर पाकिस्ताना जेमतेम दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. पाकिस्तान संघाने पहिल्या दिवसअखेर 41 षटकांत 4 बाद 158 धावांपर्यंत मजल मारली.
सकाळ पासून पडणाऱ्या पावसाने लढतीचा महत्वाचा वेळ वाया गेला. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून यजमान संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. पाकिस्तान संघाच्या 3 धावा फलकावर लागल्या असताना सलामीवीर अब्दुल्ला शफीकला हसन महमूदने आपल्या जाळ्यात अडकविले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार शान मसूदने केवळ 6 धावा काढून तंबूत परतला. शरीफुल इस्लामने बाबर आझमला भोपळा फोडण्याची संधी देखील दिली नाही. त्यामुळे 8.2 षटकांत पाकिस्तानची अवस्था 3 बाद 16 अशी झाली होती.
अयुब – शकीलची अर्धशतकी भागीदारी
3 बाद 16 अशा अशा अडचणीत संघ सापडला असताना सौद शकील फलंदाजीसाठी आला. एकाबाजूने सैम अयुब देखील धावांसाठी चाचपडत होता. मात्र शकीलने खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घेतला. यावेळी शकीलने आयुबच्या सोबतीने एकेरी -दुहेरी धावा घेण्यास सुरुवात केली. मात्र जम बसल्यानंतर दोन्ही फलंदाजानी मिळालेल्या संधीचा फायदा घेताना आक्रमक फटके मारले. अयुब व शकील यांनी 65 धावांची खेळी केली. आयुबने 98 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व एक षटकार मारताना 56 धावांची खेळी केली. शकीलने आयुबला सुरेख साथ देताना 92 चेंडूत 5 चौकारांच्या साहाय्याने नाबाद 57 धावांची खेळी केली. दिवसअखेर मोहमंद रिझवान 24 धावा काढून नाबाद राहिला.
Bangladesh Tour of Pakistan 2024
Bangladesh 🆚 Pakistan | 1st TestSTUMPS | Day 1 | Pakistan 158/4, 41 Ov
PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/5YW49LKJyW
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 21, 2024
बांगलादेशची भेदक गोलंदाजी
सकाळी पाऊस पडल्याने रावळपिंडीची खेळपट्टी बांगलादेशच्या गोलंदाजासाठी अनुकूल झाली होती. बांगलादेशचे शरीफुल इस्लाम व हसन महमूद यांनी भेदक गोलंदाजी करताना सुरुवातीपासून पाकिस्तानला धक्के देण्यास सुरुवात केली. सलामीवीर अब्दुल्ला शफीक, कर्णधार शान मसूद व बाबर आझम या तीनही पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजाना आपल्या जाळ्यात अडकविले. बाबर आझमला तर दुसऱ्याच चेंडूवर बाद केले. त्यानंतर मात्र पाकिस्तानी फलंदाजांनी संयमी फलंदाजी केली. दिवसअखेर शरीफुल इस्लाम व हसन महमूद यांनी प्रत्येकी दोन गाडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक :
पाकिस्तान : पहिला डाव : 41 षटकांत 4 बाद 158 (सौद शकील नाबाद 57 (5 चौकार), सैम अयुब 56(4 चौकार, 1 षटकार), मोहमंद रिझवान नाबाद 24 (2 चौकार) शरीफुल इस्लाम 12-4-30-2, हसन महमूद 13-3-33-2)





