Pak – China : पाकिस्तानला शस्त्र पुरवठा केल्याचा दावा चीनने फेटाळला

बीजिंग : पाकिस्तानला मालवाहतूक करणाऱ्या विमानातून लष्करी मदत पाठवल्याचा दावा चीनने फेटाळला आहे. अशी अफवा पसरवणाऱ्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही चीनने दिला आहे. चीनकडून पाकिस्तानला मदत म्हणून मोठ्या प्रमाणावर लष्करी साहित्य घेऊन शियान वाय-20 हे मालवाहू विमान पाठवल्याचे वृत्त इंटरनेटवर प्रसिद्ध झाले होते. त्यावर पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सने हे स्पष्टिकरण दिले आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तात करण्यात आलेला दावा खोटा आहे, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे काही फोटो आणि वाक्यांचे स्क्रीनशॉट देखील पीएलएएफने आपल्या वेबसाईटवर शेअर केले आहेत. या वृत्तामध्ये असलेले उल्लेख असत्य असल्याचे म्हणून त्यावर अफवा असा शिक्का देखील मारण्यात आला आहे. ज्यांनी कोणी सैन्यदलाशी संबंधित ही अफवा पसरवली आहे, त्यांना कायदेशीर मार्गाने जबाबदार धरण्यात येईल, असेही या अहवालात म्हटले गेले आहे.
चीनचे पाकिस्तानशी जवळचे संबंध असूनही पाकिस्तानला लष्करी मदत न पाठवल्याचे स्पष्टिकरण चीनकडून देण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचा निर्णय सामंजस्याने घेतला गेल्याच्या दोनदिवसांनंतर हे स्पष्टिकरण देण्यात आले. चीनकडून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर शस्त्र पुरवठा केला जात असला तरी गेल्या काही दिवसात भारत- पाकिस्तान दरम्यानच्यलष्करी संघर्षाच्या बातम्यांना चिनी माध्यमांकडून जरा जास्त प्रसिद्धी दिली गेली.
विशेषतः पाकिस्तानच्या आत खोलवर असलेल्या नऊ दहशतवादी ठिकाणांवर भारतीय हवाई दलाने केलेले हल्ले आणि त्यानंतर रडार सिस्टीम आणि हवाई तळांवर केलेले हल्ल्यांनंतर भारताची विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानकडून केला गेला होता. हे वृत्त चिनी माध्यमांनी ठळकपणे प्रसिद्ध केले होते. पण भारतीय दूतावासाने पाकिस्तानच्या दाव्यातील तथ्य पडताळून पाहण्याची सूचना चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी नियतकालिकाला केली. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारीही चीनने दाखवली होती.
चीन हा पाकिस्तानचा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार
चीनकडून पाकिस्तानला सर्वात जास्त शस्त्र पुरवठा केला जातो. २०२० ते २०२४ या कालावधीत चीनच्या शस्त्र उत्पादनांपैकी ८१ टक्के शस्त्र खरेदी एकट्या पाकिस्तानकडूनच केली गेली होती. त्यामध्ये अत्याधुनिक लढाऊ विमाने, रडार, नौदलाची जहाजे, पाणबुड्या आणि क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. दोन्ही देशांनी मिळून जा-१७ विमानांची निर्मिती केली. ही विमाने पाकिस्तानच्या हवाई दलातील प्रमुख विमाने आहेत, असे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्युटने म्हटले आहे.





