satara | म्हासुर्णेच्या कुस्ती मैदानात पै. संदीप मोठे विजयी

म्हासुर्णे, (प्रतिनिधी)- म्हासुर्णे (ता. खटाव) येथील श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात सांगलीच्या भोसले व्यायाम शाळेच्या संदीप मोठे याने पुण्याच्या बीईजीचा पै. संग्राम पाटील पैलवानाला पोकळ घिस्सा या डावावर चितपट केले. विजेता पै. संदीप मोठे याला यात्रा कमिटीच्यावतीने एक लाख ५१ हजारांचे इनाम देण्यात आले.
पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा पै. राहुल सुळ विरुध्द कोल्हापूरच्या शाहुपुरी तालीमचा पै. राहुल ठोंबरे यांची द्वितीय क्रमांकाची एक लाख पंचवीस हजार रुपयांची कुस्ती बरोबरीत सुटली. तसेच कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल कोल्हापूर पै.पृथ्वीराज पाटील विरुध्द बी,इ.जी ग्रुप पुणे अनिरुद्र पाटील यांची तृतीय क्रमांकांची एक लाख रुपयांची कुस्ती पै. पृथ्वीराज पाटील याने घुटना डावावर ठोंबरेला चितपट केले. पुण्याचा पै. मंगेश माने विरुध्द कुरुंदवाडच्या छत्रपती शिवाजी आखाड्याचा पै. अमित सुळ यांच्यात चतृर्थ क्रमांकाची ७५ हजार इनामाची कुस्ती बरोबरीत सुटली.
या सर्व कुस्त्या श्री भैरवनाथ यात्रा कमिटीने आखाडा तयार करुन भरवल्या होत्या. सायंकाळी ५ वाजता सुरु झालेली कुस्ती स्पर्धा रात्री ८.३० वाजेपर्यंत सुरु होत्या. कुस्त्या पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकिनांनी हजेरी लावली होती. अनेक कुस्त्या डोळ्याची पापणी लवताच क्षणी पैलवानांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर डाव प्रतिडाव करत जिंकल्या. अनेक लक्षवेधी लढती पाहताना तर कुस्ती शौकीनांचा श्वास रोखला होता.
कुस्तीचे पंच म्हणून आण्णासो माने, नदंकुमार माने, अजित माने, तुषार माने, विठ्ठल माने, सचिन माने, किसन माने, तुळशीराम माने, दादासो कदम, गोरख माने, राजाराम माने, बाळू माने, हिरोजी माने, विश्वास माने, बापूराव माने, नावजी माने, दादा पाटील, सुहास माने, गुलाब वायदंडे, विलास यमगर यांनी काम पाहिले.
परशुराम पवार यांनी धावते समालोचन केले. कुस्ती मैदान यशस्वी पार पाडण्यासाठी सरपंच महेश पवार, उपसरपंच सचिन माने, चेअरमन महादेव माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने, विठ्ठल माने, ज्ञानेश्वर माने, नामदेव माने, पांडुरंग माने, नवनाथ माने, सिकंदर मुल्ला, चंद्रकांत माने, गोरख, अधिक माने, जालिंदर माने यांनी परिश्रम घेतले.





