Pahalgam Attack : संपूर्ण देशाची फसवणूक झाली? काँग्रेसकडून मोदी सरकारला सवालांचा भडीमार

Pahalgam Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून कॉंग्रेसने सोमवारी मोदी सरकारवर विविध प्रश्नांची सरबत्ती केली. हल्लेखोर ठार झाले का किंवा त्यांना अटक झाली का, असा सवाल त्या पक्षाने केला. सरकारकडे विविध प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी कॉंग्रेसचे सरचिटणीस भुपेश बघेल यांनी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली.
पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात सुरक्षाविषयक त्रुटींची कबुली सरकारने मागील सर्वपक्षीय बैठकीत दिली. त्या त्रुटींची जबाबदारी कोण घेणार आहे? केंद्रीय गृहमंत्री राजीनामा देणार आहेत का, अशी विचारणा करत त्यांनी सरकारला घेरले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७१ मध्ये भारत कुणापुढे झुकणार नसल्याचे संपूर्ण जगाला दाखवून दिले. त्यावेळी त्यांनी अमेरिकेचा दबाव झुगारून पाकिस्तानला पराभूत केले.
मात्र, आता अमेरिकेच्या दबावाखाली आपले धोरण बदलले आहे का असे आम्ही सरकारला विचारू इच्छितो. बहुधा परराष्ट्र धोरण बदलल्याने सरकार जनतेच्या भावनांशी खेळत आहे. तसे वाटण्याचे कारण म्हणजे अमेरिका सांगेल तसे आपण वागत आहोत.
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षविरामाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. संबंधित घोषणेसाठी अवलंबण्यात आलेल्या पद्धतीमुळे फसवणूक झाल्याची देशाची भावना आहे. ट्रम्प यांनी घोषणा करण्याची बाब मोदी सरकारचे राजनैतिक अपयश आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
…तर खर्गे राहणार अनुपस्थित
संसदेचे विशेष अधिवेशन किंवा सर्वपक्षीय बैठक का बोलावण्यात आली नाही? तशी बैठक बोलवली गेल्यास त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभागी व्हायला हवे. अन्यथा, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तशा बैठकांना अनुपस्थित राहतील, असे बघेल यांनी नमूद केले.





