Pahalgam Attack : पाकिस्तानी नागरिकांसाठी घरवापसीची मुदत समाप्त; अटारी सीमेवरून ५३७ जण परतले

Pahalgam Attack – पाकिस्तानी नागरिकांना घरवापसीसाठी भारताने दिलेली मुदत रविवारी समाप्त झाली. संबंधित डेडलाईनचे पालन करत ४ दिवसांत ५३७ पाकिस्तानी अटारी-वाघा सीमेवरून त्यांच्या देशात परतले. त्यामध्ये ९ राजनैतिक आणि इतर अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
पाकिस्तानशी लागेबांधे असणाऱ्या दहशतवाद्यांनी २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पहलगाम जवळ भयंकर हल्ला घडवला. त्यावरून पाकिस्तानला नामोहरम करण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारने काही धडक पाऊले उचलली. त्याचाच भाग म्हणून पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परतण्याचा आदेश देण्यात आला.
त्यासाठी आवश्यक कृती म्हणून पाकिस्तानी नागरिकांसाठी जारी करण्यात आलेले व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. तो निर्णय १२ प्रकारच्या अल्पकालीन व्हिसाधारकांसाठी लागू करण्यात आला. व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, विद्यार्थी, पर्यटकांचा समूह, यात्रा आदींशी निगडीत ते व्हिसा आहेत. भारत सोडण्यासाठी सार्क व्हिसाधारकांना २६, तर वैद्यकीय व्हिसाधारकांसाठी २९ एप्रिलची मुदत देण्यात आली.
भारताच्या आदेशानुसार परतण्यासाठी मागील ४ दिवसांत पाकिस्तानी नागरिकांची लगबग सुरू झाली. मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे रविवारी सर्वांधिक २३७ पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून मायदेशी परतले. त्या सीमेवरून २४ एप्रिलला २८, २५ एप्रिलला १९१, तर २६ एप्रिलला ८१ पाकिस्तानींनी घरवापसी केली.
मुदत संपत असल्याने सीमा भागात माणसांची आणि वाहनांची मोठी वर्दळ दिसत होती. पाकिस्तानी नागरिकांना निरोप देण्यासाठी त्यांचे नातलगही मोठ्या संख्येने आले होते. एकमेकांपासून दुरावण्याच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्टपणे दिसत होत्या. अटारी सीमा पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात आहे.
संबंधित सीमेव्यतिरिक्त काही पाकिस्तानी नागरिकांनी परतण्यासाठी विमान प्रवासाचाही अवलंब केला असण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये थेट विमानसेवा सुरू नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिक विमान प्रवासाच्या माध्यमातून इतर देश गाठू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दीर्घ मुदतीच्या आणि राजनैतिक व्हिसा धारकांसाठी भारत सोडण्याचा आदेश लागू नाही.





