Pachpadra Refinery : पाचपद्रा रिफायनरीला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार होते उदघाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या बहुप्रतिक्षित रिफायनरीचे (Pachpadra Refinery) उद्घाटन होणार होते, त्याच ठिकाणी चोवीस तास आधी भीषण आग लागल्याने खळबळ उडाली आहे.

Pachpadra Refinery : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या बहुप्रतिक्षित रिफायनरीचे (Pachpadra Refinery) उद्घाटन होणार होते, त्याच ठिकाणी चोवीस तास आधी भीषण आग लागल्याने खळबळ उडाली आहे.
बालोत्रा जिल्ह्यातील पाचपद्रा येथील या प्रकल्पात (Pachpadra Refinery) लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे काळे ढग पसरले असून, या घटनेने प्रकल्पाच्या सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ही रिफायनरी भारतातील पहिली ‘ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी-सह-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’ असून, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि राजस्थान सरकार यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. भारताचे इंधनावरील आयातीचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
या प्रकल्पाचा राजकीय प्रवासही रंजक राहिला आहे. २०१३ मध्ये तत्कालीन अशोक गेहलोत सरकारच्या काळात सोनिया गांधी यांनी ३७,२३० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. त्यानंतर सत्तांतर झाल्यावर, २०१८ मध्ये पंतप्रधान मोदींनी ४३,१२९ कोटींच्या सुधारित खर्चासह या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू केले.
केवळ इंधनच नव्हे, तर या रिफायनरीमधून (Pachpadra Refinery) उत्पादित होणाऱ्या पॉलीप्रोपिलीन, बेंझिन आणि टोल्युइन यांसारख्या पेट्रोकेमिकल्समुळे राजस्थानमध्ये प्लास्टिक, ऑटोमोबाईल आणि वैद्यकीय उपकरणांशी संबंधित उद्योगांचे मोठे जाळे विणले जाणार आहे.
या एकात्मिक विकासामुळे राजस्थान जागतिक स्तरावर उत्पादनाचे केंद्र म्हणून उदयास येण्याची चिन्हे आहेत. मात्र, उद्घाटनाच्या काही तास आधी घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.






