Ozarde Waterfall: कोयनचे ‘स्वर्ग’ अवतरले! नवजा येथील ओझर्डे धबधब्याचे सौंदर्य खुलले, पर्यटकांची मोठी गर्दी
Ozarde Waterfall: वाऱ्याच्या तालावर डोलणारी झाडे आणि ओसंडून वाहणारा ओझर्डे धबधबा; निसर्गप्रेमी ट्रेकर्ससाठी नवजा-कोयनानगर ठरतंय पसंतीचं ठिकाण.

Ozarde Waterfall – कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने, निसर्गाने आपले सौंदर्य उधळले असून, संपूर्ण परिसराने हिरवागार शालू नेसल्याचे भासत आहे. नवजा येथील ओझर्डे धबधबा ओसंडून वाहत आहे. धुके आणि पावसाच्या सरींमुळे या धबधब्याचे सौंदर्य खुलले असून, पावसाळी पर्यटनाला वेग आला आहे. डोंगराच्या उंच कड्यावरून कोसळणार्या ओझर्डे धबधब्याच्या शुभ्र धारा, त्यातून उडणारे पाण्याचे थंडगार तुषार आणि भोवती पसरलेली धुक्याची चादर यामुळे परिसरात स्वप्नवत वातावरण निर्माण झाले आहे.
वार्याच्या तालावर डोलणारी झाडे, हिरवाईने बहरलेले डोंगर आणि ढगांनी वेढलेले आकाश निसर्गप्रेमींचे मन हरखून टाकत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील ओढे, नाले आणि झरे पुन्हा वाहते झाले असून, दर्यांमध्ये पाण्याचा सुरेल नाद घुमत आहे. नवजा व कोयनानगर परिसरात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने, प्रत्येक वळणावर निसर्गाचे नवे रूप पाहायला मिळत आहे. या नयनरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळत आहे.
विशेषतः तरुणाई आणि ट्रेकर्स धबधब्याच्या सान्निध्यातील क्षण मोबाइल कॅमेर्यांमध्ये टिपण्यात मग्न होत आहेत. पावसाळी पर्यटनामुळे स्थानिक व्यवसायालाही संजीवनी मिळाली आहे. पावसाचा जोर असल्याने प्रशासनाकडून पर्यटकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. धबधब्याच्या परिसरात सुरक्षित अंतर राखावे, वेगाने वाहणार्या पाण्यात उतरणे टाळावे आणि निसर्गाचा आनंद घेताना खबरदारी बाळगावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोयना खोर्यात कोसळणार्या पावसाच्या सरी, घुमणारा पाण्याचा नाद आणि ओझर्डे धबधब्याचे सौंदर्य यामुळे हा परिसर निसर्गप्रेमींना जणू स्वर्गीय अनुभव देणारा ठरत आहे.





