ओझर: “मुलांची पहिली गुरु आई असते. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी घडवले, तसेच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना योग्य संस्कार द्यावेत. आजच्या काळात मोबाइल हा मुलांचा सर्वात मोठा शत्रू बनला आहे. मुलांना मोबाइलपासून दूर ठेवून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करा आणि ग्रंथालयांचा वापर वाढवा,” असा मौलिक सल्ला जुन्नरचे द्वितीय सहाय्यक दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) ए. एच. बाजड यांनी दिला. शनिवारी, 23 ऑगस्ट 2025 रोजी, तालुका विधी सेवा समिती, जुन्नर आणि जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नरपासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या अति दुर्गम आदिवासी भागातील ग्रामपंचायत देवळे येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जुन्नरच्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एस. नायर यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश ए. एच. बाजड होते. या शिबिरात जुन्नर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिवदास तांबे, सचिव अॅड. आशिष वानखेडे, अॅड. सचिन चव्हाण, अॅड. लक्ष्मी घुटे, अॅड. गायत्री चव्हाण, अॅड. गणेश आल्हाट, अॅड. केतन पडवळ, अॅड. रणजीत भगत, तसेच न्यायालयीन कर्मचारी प्रशांत मोरतळे आणि ओमकार निकम उपस्थित होते. गावातून सरपंच दीपक घुटे, उपसरपंच शिवाजी बोराडे, पेसा समन्वयक तुकाराम लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक-युवती आणि मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले. अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश बाजड यांनी पालकांना मुलांच्या संगोपनात संस्कार आणि शिक्षणाच्या महत्त्वावर जोर दिला. तसेच, उपस्थित मान्यवरांनी महिला सुरक्षा व गोपनीयता, पीडितांना नुकसान भरपाई योजना, पोस्को कायदा, शासकीय योजना, पेसा कायदा, नालसा अंतर्गत कल्याणकारी योजना आणि आदिवासी जमिनीशी संबंधित कायदेशीर तरतुदी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सचिन यशवंत चव्हाण यांनी केले. प्रस्तावना अॅड. शिवदास तांबे यांनी मांडली, तर आभार प्रदर्शन सरपंच दीपक घुटे यांनी केले.हे कायदेविषयक शिबिर अत्यंत यशस्वी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.