Ozar News: पर्यटकांसाठी खूशखबर! श्रीक्षेत्र ओझरच्या धरणात लवकरच सुरू होणार नौकाविहार
Ozar News: देवस्थान ट्रस्टच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; जलसंपदा विभाग आणि राज्य शासनाकडून ओझर येथील येडगाव जलाशयात बोटिंगला हिरवा कंदील.

Ozar News – तीर्थक्षेत्र ओझर येथील विघ्नहराच्या मंदिराजवळ असणाऱ्या येडगाव जलाशयात नौका विहारास परवानगी मिळावी यासाठी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट सातत्याने पाठपुरावा करत होते. देवस्थान ट्रस्टच्या सततच्या पाठपुराव्याला यश येऊन महाराष्ट्र शासनाने श्रीक्षेत्र ओझर येथील जलाशयात नौका विहार करण्यास परवानगी दिल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांनी दिली आहे.
अष्टविनायक गणपतीपैकी पवित्र तीर्थक्षत्र येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरविण्याचे कार्य देवस्थान ट्रस्ट गेली अनेक वर्ष करीत आहे. “विघ्नहर्ता” बापा मोरया हा नवसाला पावणारा गणपती असा अनेक गणेश भक्तांचा अनुभव आहे. शासनाने जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित केल्यापासून तालुक्यात अष्टविनायक दर्शनाबरोबरच पर्यटन करण्यास देशभरातून भाविक येत आहेत.
दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. श्री विघ्नहर मंदिराशेजारी येडगाव धरणाचा मोठा जलाशय असल्यामुळे जलाशयात नौका विहारास परवानगी मिळावी, यासाठी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट सातत्याने पाठपुरावा करीत होते. देवस्थान ट्रस्टच्या सततच्या पाठपुराव्याला यश येऊन शासनाने श्रीक्षेत्र ओझर येथील जलाशयात नौका विहार करण्यास परवानगी दिली आहे. नौका विहारासाठी परवानगीच्या प्रतीक्षेत देवस्थान ट्रस्ट होते.
आता ती परवानगी मिळाल्याने “श्रीं” चा जन्मोत्सव सोहळा जवळच आला आहे. या मुहूर्तावर नौका विहार सुरु करण्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांनी सांगितले. परवानगीसाठी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विश्वस्त, विद्यमान विश्वस्त, आमदार, जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्री, जलसंपदा अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे कवडे यांनी आवर्जून सांगितले.
रोजगारवाटा मोठ्या प्रमाणात वाढणार
श्री क्षेत्र ओझरच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार असून भाविक व पर्यटक श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहराच्या दर्शनासाठी आल्यानंतर नौकाविहार करण्याचा आनंद या उपक्रमामुळे घेणार आहे. स्थानिक रोजगार, पर्यटन व परिसराचा सर्वांगीण विकास होऊन देवस्थान ट्रस्टच्या वैभवात भर पडणार आहे.



