ओझर : श्री क्षेत्र ओझर येथे भाद्रपद गणेश जयंतीनिमित्त गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जन्मोत्सव सोहळ्याचा समारोप भव्य कुस्ती आखाड्याने झाला. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व विश्वस्त मंडळाच्या सहभागाने हा आखाडा यशस्वीपणे संपन्न झाला. विशेष म्हणजे, यंदा महिलांच्या कुस्त्याही आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे आखाड्याला वेगळीच रंगत आली. पुणे, सोलापूर, नगर, मुंबई आणि सातारा जिल्ह्यांतील नामवंत मल्लांनी या आखाड्यात सहभाग घेतला. ओझरसह शिरोली बुद्रुक, शिरोली खुर्द, तेजेवाडी, धालेवाडी, हिवरे बुद्रुक, हिवरे खुर्द आदी गावांमधील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. आखाड्याचे लिलाव माजी विद्यार्थी संघटना, श्रीक्षेत्र ओझर (रु. १,५५,५५५), २००७ एस.एस.सी. बॅच (रु. ७७,७७७) आणि पानसुपारीचे लिलावदार विलास सोनू कवडे (रु. ५५,०००) यांनी जिंकले. या सर्वांचा जाहीर सत्कार करण्यात आला, तसेच त्यांची ढोल-ताशांच्या गजरात ओपन जिपमधून मिरवणूक काढण्यात आली. आखाड्याचे पंच म्हणून लक्ष्मण टेंभेकर, किशोर कवडे, गणेश राऊत, मंगेश मांडे, शहाजी रवळे, विनायक मांडे, पोलीस पाटील मोहन रवळे आणि गणपत कवडे यांनी जबाबदारी सांभाळली. समालोचन विश्वस्त सूर्यकांत रवळे आणि कैलास मांडे यांनी केले. या प्रसंगी आमदार अतुल बेनके, देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष शाकुजी कवडे, ग्रामविकास अध्यक्ष संतोष मांडे, विश्वस्त आनंदराव मांडे, रंगनाथ रवळे, गणपत कवडे, हिवरे गावचे सरपंच निलेश बेनके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आखाड्यात एकूण सात कुस्त्या झाल्या, ज्यामध्ये ५,००० ते ११,००० रुपयांपर्यंत इनाम होत्या. शेवटची कुस्ती पिंपळवंडी येथील राहुल फुलमाळी आणि राहुली येथील अनिल ब्राह्मणे यांच्यात झाली, ज्यात अनिल ब्राह्मणे यांनी ११,००० रुपयांचे इनाम जिंकले. यात्रा उत्सवाचे नियोजन विघ्नहर गणपती ट्रस्ट आणि ग्रामविकास संस्था, ओझर यांनी केले. अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनिल घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त प्रकाश मांडे, सूर्यकांत रवळे, गोविंद कवडे, विक्रम कवडे, समीर मांडे, विनायक मांडे, संतोष कवडे, विलास कवडे, मंगेश पोखरकर, विनायक जाधव, शिल्पा जगदाळे, देवस्थानचे व्यवस्थापक आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. यात्रेची सांगता रात्री ९ वाजता विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे “महाराष्ट्राची गौरवगाथा” या लोकनृत्याच्या कार्यक्रमाने झाली. उदय साठम यांच्या ५५ कलाकारांच्या संचाने उपस्थितांचे मनोरंजन केले.