हडपसर – महानगरपालिकेच्या अण्णासाहेब मगर रुग्णालयात चार टन क्षमतेचा ऑक्सिजननिर्मिती प्लांट उभा करण्यात येणार आहे. यासाठी आमदार चेतन तुपे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आपल्या स्थानिक विकास निधीतून खर्च करण्याचे पत्र आमदार तुपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला असून बेड्स, रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. शासकीय यंत्रणा शक्य ते सर्व उपाय योजून हा तुटवडा भरून काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कोविड-19च्या उपाययोजनांसाठी आमदारांना मिळणाऱ्या स्थानिक विकास निधीतून खर्च करण्याच्या मर्यादेत वाढ करून दिली आहे.
करोना उपचारात ऑक्सिजनचे सर्वात जास्त महत्त्व आहे. परंतु, ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना करोना विरोधातील लढाई लढणे अत्यंत अवघड झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार चेतन तुपे यांनी प्राधान्याने ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्याचे ठरविले आणि आपल्या स्थानिक विकास निधीतून ऑक्सिजननिर्मिती प्लांट सुरू करण्यासाठी तातडीने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
अण्णासाहेब मगर रुग्णालयामध्ये 4 टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट सुरू झाल्यास हडपसर भागातील रुग्णांना ऑक्सिजनसाठी इकडे-तिकडे फिरावे लागणार नाही. आता प्रशासनाने या प्लांटचे काम लवकरात लवकर सुरू करावे एवढीच अपेक्षा.
– चेतन विठ्ठल तुपे, आमदार, हडपसर