Pimpri : वाढलेली झुडपे, गवत देताहेत अपघातांना आमंत्रण

कान्हे : पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या दुभाजक परिसरात झुडपे व गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे समोरून येणारी वाहने नजरेस न पडल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्याही अस्पष्ट असून मागील काही वर्षांत किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याच ठिकाणी गेल्या वर्षी एका दांपत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
या रस्त्याच्या एका बाजूला उतार असल्याने मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहने दिसत नाहीत. त्यातच दुभाजकाजवळ वाढलेले गवत व झाडांमुळे रस्त्याचा पुढील भाग नीट दिसत नाही. परिणामी, पादचारी तसेच दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. वाहनांचा वेग या ठिकाणी प्रचंड असतो आणि झेब्रा क्रॉसिंग न दिसल्यामुळे वाहनचालकही वेगात वाहने चालवत जातात. यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून जोर धरत आहे.
नागरिकांची मागणी
दुभाजकावरील गवत व झुडपे त्वरित हटवावीत.
झेब्रा क्रॉसिंगचे पुनरुज्जीवन करून स्पष्ट खुणा कराव्यात.
आवश्यक तेथे स्पीड ब्रेकर बसवावेत.
परिसरात सूचना फलक व चेतावणी चिन्हे लावावीत.
या ठिकाणी अपघात होत असले तरी आयआरबी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. दुभाजकावरील गवत व झुडपे त्वरित कापून टाकण्यात यावीत.
– संतोष कदम, स्थानिक रहिवासी





