Tokyo Olympics : परिस्थितीवर मात करत रेवती ऑलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली – भारतीय क्रीडा क्षेत्रात अनेक खेळाडू असे आहेत की त्यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करत मोठे यश मिळवले आहे. रेवती विरामनी ही तमिळनाडूतील अशीच एक 23 वर्षांची कष्टाळू मुलगी असून तिने 4 बाय 400 मीटर मिश्र रिले स्पर्धेत ऑलिम्पिक पात्रता मिळवली आहे.
वयाच्या 5 व्या वर्षी अनाथ झालेली रेवती वीरामनी हिचा सांभाळ रोजंदारीवर काम करत असलेल्या एका वयस्कर महिलेने केला. जशी ती मोठी होत गेली तेव्हा तिला धावण्याच्या शर्यतीची गोडी लागली व त्यातच कारकीर्द करण्याचे तिने ठरवले. बूट किंवा चप्पल घेण्याचीही तिची परिस्थिती नसल्याने तिने अनवाणी सराव केला. ती आता टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरली असून देशाला पदक मिळवून देण्याचेच तिचे स्वप्न आहे.
तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील सकीमंगलम या गावातून क्रीडा क्षेत्रात पुढे आलेली रेवती टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताच्या चार बाय 400 मीटर मिश्र रिले संघाकडून सहभागी होत आहे.
माझ्या वडिलांना पोटाचा त्रास असल्याने त्यांचे निधन झाले आणि सहा महिन्यानंतर आईचेही निधन झाले. त्यानंतर मला आणि बहिणीला माझी आजी अराम्मल हिने सांभाळले. तिला त्यासाठी वीटभट्टीवर मजुरी करावी लागत होती. तिला आमच्या काही नातलगांनी आम्हाला शाळेत पाठवू नको असे सांगितले होते. मात्र, आजीने काबाडकष्ट करुन आम्हाला शिकवले, असे रेवतीने सांगितले.
ऑलम्पिकमध्ये सहभागी होत असलेली रेवती भारतीय रेल्वेमध्ये टीटीई म्हणून नोकरी करते. तर तिची लहान बहीण चेन्नई पोलीस दलात अधिकारी आहे. माझ्या आजीने खूप मेहनत करुन आम्हाला सांभाळले. तसेच माझे गुरुजी कन्नन सर यांनी क्रीडा क्षेत्रातच माझी कारकीर्द व्हावी यासाठी खूप मदत केली.
मी कॉलेजच्या स्पर्धांमध्ये अनवाणी स्थितीतच भाग घेतला होता. 2016 सालच्या कोयंबत्तूर राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये कन्नन सरांनी मला मदत करुन योग्य त्या सोयीसुविधा पुरवल्या ज्यामुळे मी यशस्वी होऊ शकले, असे रेवती म्हणाली.
रेवतीच्या कामगिरीकडे लक्ष
रेवती मिश्र सांघिक 4 बाय 400 मीटर शर्यतीत सहभागी होत आहे. तिची राष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील कामगिरी पाहता ती जपानमध्ये चमत्कार घडवेल असा विश्वास वाटतो. ऑलिम्पिकचे पदक मिळवण्यात ती यशस्वी ठरली तर अथलेटिक्समध्ये भारताला जागतिक किर्तीची खेळाडू गवसणार आहे. त्यामुळे तिच्या कामगिरीकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष राहणार आहे.





