पिंपरी | वडगावच्या रस्त्यावर नागरिकांचा ‘आक्रोश’

वडगाव मावळ (प्रतिनिधी) – बदलापूर (जि. ठाणे) येथे चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. गुरूवारी मावळ तालुक्यात या अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
वडगाव मावळ येथे महाविकास आघाडीच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी श्री पोटोबा महाराज मंदिर ते तहसिल कार्यालय अशा पायी मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सामील झाले होते.
एक आठवड्यापूर्वी कोलकाता येथील एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची गंभीर घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता महाराष्ट्रात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली.
बदलापूर येथे एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर एका २४ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. लहानग्या मुलींनी आपल्या पालकांना याबाबत सांगितल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
‘गृहमंत्र्यांचे लक्ष सत्तेवर, कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर’, ‘न्याय द्या, न्याय द्या, लाडक्या बहिणीला न्याय द्या’ अशा घोषणा आंदोलकांनी मोर्चादरम्यान दिल्या. तसेच सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला.
मोर्चादरम्यान अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत आपली चिंता बोलून दाखविली, तसेच राज्य सरकारचा निषेध केला. महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यात महायुती सरकार अपयशी ठरल्याची टीका यावेळी करण्यात आली.
नराधमाला फाशी देण्याची मागणी –
राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नराधमांना कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. सत्ताधारी कितीही लाडकी बहीण योजनेची जाहिरात करीत असले तरीही महाराष्ट्रातील माताभगिनी सुरक्षित नाहीत.
महाराष्ट्रात घडत असलेल्या विकृतीला ठेचण्यासाठी मावळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला फाशी द्या, चिमुकल्यांना न्याय द्या.
तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यावे, अशा मागणीचे निवेदन तहसिलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले.
यावेळी महाविकासआघाडीचे पदाधिकारी अतुल राऊत, दत्तात्रय पडवळ, यशवंत मोहोळ, आशिष ठोंबरे, विशाल वहिले, राजेश वाघोले, उमेश गावडे, भारत ठाकूर, मंगेश ढोरे, जयश्री पवार, शैला खंडागळे, पुजा वहिले, आरती राऊत, नीलम घाडगे, संगीता सोनवणे,
पुष्पा भोकसे, जयश्री मदगे, रोहिदास वाळुंज, बाळासाहेब शिंदे, नंदकुमार कोतुळकर, आफताब सय्यद, राजेश बाफना, माऊली काळोखे, बाळासाहेब फाटक, सुरेश गुप्ता, भरत भोते, राहुल नखाते, शांताराम दहिभाते आदी पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यात महायुती सरकार व गृहमंत्रालय अपयशी ठरले असून सुसंस्कृत महाराष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख पुसून महाराष्ट्र युपी-बिहारच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नराधमांना कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. महाराष्ट्रातील महिला, मुली आज सुरक्षित नाहीत. – विशाल वहिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार





