Badlapur News : बदलापूरमध्ये मराठी- अमराठीचा वाद पेटला; मनसैनिकांकडून परप्रांतीयाला चोप

बदलापूर : बदलापूर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात एका परप्रांतीय फेरीवाल्याने मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्याने स्थानिक मनसैनिकांनी त्याला चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर फेरीवाल्याला सर्व मराठी जनतेची माफी मागण्यास भाग पाडले गेले. सध्या या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं?
बदलापूर पश्चिमेतील ट्रेंड्स शॉपजवळ सकाळच्या सुमारास महानगरपालिकेचे कर्मचारी फेरीवाल्यांवर कारवाई करत होते. यावेळी एका परप्रांतीय फळविक्रेत्याने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान केला. एवढेच नव्हे, तर त्याने कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला, ज्यामध्ये एक कर्मचारी जखमी झाला. या घटनेची माहिती स्थानिक मनसैनिकांना मिळताच त्यांनी त्या फेरीवाल्याला बेदम मारहाण केली आणि मराठी समाजाची माफी मागण्यास भाग पाडले. मारहाणीनंतर फेरीवाल्याने हात जोडून माफी मागितली.
परप्रांतीय फेरीवाल्यांची वाढती मुजोरी
बदलापूरात परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यापूर्वीही अनेकदा स्थानिक नागरिकांनी त्यांच्या मुजोरीबाबत महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. या घटनेनंतर मनसैनिकांनी सर्व फेरीवाल्यांना कडक इशारा दिला आहे. “यापुढे मराठी भाषेचा किंवा मराठी माणसाचा अवमान केल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परप्रांतीय व्यक्तींच्या महाराष्ट्रातील वर्तनावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणावरून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





