चीनमध्ये नवीन फ्लू विषाणूचा उद्रेक

बीजिंग- चीनमध्ये डुकरांपासून एका नवीन विषाणूचा प्रादुर्भाव पहायला मिळतो आहे. वराहपालन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये या रोगाची लागण झाल्याचे पहायला मिळते आहे. या विषाणूमध्ये साथ पसरवणाऱ्या विषाणूची सर्व लक्षणे पहायला मिळत असल्याचे अभ्यासातून आढळले आहे. “पीएनएएस’ या विज्ञानविषयक जर्नलमध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध झाली असून 2011 ते 2018 या कालावधीत चीनमधील डुकरांच्या निरीक्षणाद्वारे हा अभ्यास केला गेला आहे.
इंफ्लूएंझा सारख्या प्रभावशालील या विषाणूला “जी-4′ असे नाव देण्यात आले आहे. 2016 पासून डुकरांमध्ये या विषाणूचा प्रभाव अधिक दिसतो आहे. हा नवीन विषाणू जगभर 2009 मध्ये पसरलेल्या “एच1एन1’चाच वारसदार असल्याने तो अधिक धोकादायक ठरू शकतो, असे चीनमधील अनेक विद्यापीठे आणि चीनच्या “सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शन’च्या वैज्ञानिकांकडून सांगण्यात आले आहे.
वराहपालन उद्योगातील कामगारांच्या रक्ताची चाचणी घेतल्यावर 10 टक्के कामगार “जी-4′ विषाणूच्या संसर्गात पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रामुख्याने 18 ते 35 वयोगटातील कामगारांमध्ये पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण 20 टक्के इतके आहे. “जी-4’मुळे मानवामध्ये अद्याप प्रतिकारक्षमता विकसित झालेली नाही. त्यामुळे इंफ्लूएंझाच्या अन्य औषधांमुळे “जी-4’ला प्रतिबंध केला जाऊ शकत नाही, असेही संशोधकांनी म्हटले आहे.





