JJP-ASP alliance Haryana Election 2024: दुष्यंत चौटाला-चंद्रशेखर आझाद यांच्यात युती, ‘असं’ ठरलं जागावाटप

JJP-ASP alliance Haryana Election 2024: हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि UP चा मोठा दलित चेहरा आणि खासदार चंद्रशेखर आझाद एकत्र हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 लढवणार आहेत. चौटाला यांचा जननायक जनता पक्ष आणि चंद्रशेखर यांचा आझाद समाज पक्ष (कांशीराम) यांच्यात युती झाली आहे.
मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद यांनी जेजेपी-एएसपी यांच्यातील युतीबद्दल माहिती दिली आणि हरियाणातील 90 जागांच्या वाटपाबद्दलही सांगितले.
दुष्यंत चौटाला म्हणाले की, आम्ही जागावाटपावर सविस्तर चर्चा केली आहे. JJP 70 जागांवर तर ASP 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे. दोन्ही पक्ष मिळून लवकरच संपूर्ण राज्याचा रोडमॅप-रूटमॅप जनतेसमोर मांडणार आहोत.
#WATCH | Jannayak Janta Party (JJP) and Chandra Shekhar Azad’s Azad Samaj Party (Kanshi Ram) formed an alliance for the Haryana Assembly elections.
“Out of 90 seats, JJP to contest on 70 seats and Azad Samaj party on 20 seats, ” says JJP leader Dushyant Chautala https://t.co/7GLELINaog pic.twitter.com/53q532WXjv
— ANI (@ANI) August 27, 2024
चौटाला यांनी सांगितले की, जननायक जनता पार्टी आणि आझाद समाज पक्षाने हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४ च्या जागावाटपाच्या अंतर्गत कोणत्या जिल्ह्यांतील कोणत्या विधानसभा मतदारसंघांची निवड केली आहे हे देखील नामांकनापूर्वी स्वतंत्रपणे सांगितले जाईल.
दरम्यान, ‘इंडियन नॅशनल लोक दल’पासून वेगळे झाल्यानंतर 2018 मध्ये स्थापन झालेल्या जननायक जनता पक्षाने 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत 10 जागा जिंकून किंगमेकरच्या भूमिकेत उतरला होता. भाजप यावेळी सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा आणि काॅंग्रेस 10 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. जेजेपी आणि एएसपी यांच्या युतीला यश मिळाले तर भाजप आणि काँग्रेसमधील खेळ आणखी बिघडण्याची शक्यता आहे. हे दोन्ही पक्ष अनेक जागांवर आघाडी घेऊ शकतात.
दुष्यंत चौटाला यांनी भाजपला पाठिंबा देऊन मनोहर लाल खट्टर सरकार स्थापन केले. त्यामुळे चौटाला यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. 2024 मध्ये जेव्हा भाजप-जेजेपी युती तुटली तेव्हा भाजपने अल्पमतात सरकार स्थापन केले आणि नायबसिंग सैनी मुख्यमंत्री झाले.
2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत जेजेपीचा मार्ग सोपा नाही, कारण 10 पैकी 6 आमदारांनी जेजेपीचा राजीनामा दिला आहे. जेजेपीचे हे आमदार भाजप-काँग्रेसमध्ये दाखल झाले. आता जेजेपीकडे फक्त चार आमदार उरले आहेत.
दरम्यान, हरियाणात 12 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. यानंतर 13 सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून 16 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. 1 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.





