“आमचे संबंध राम-लक्ष्मणासारखे, कुठलाच रावण विभक्त करू शकत नाही” – मनीष सिसोदिया

नवी दिल्ली – आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यापासून मला वेगळे करण्याची भाजपची इच्छा आहे. मात्र, आमच्यातील संबंध भगवान राम आणि लक्ष्मणासारखे आहेत. त्यामुळे आम्हाला विभक्त करण्याची ताकद कुठल्याच रावणात नाही, असे भाष्य आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी केले.
केजरीवाल यांनी रविवारी पहिली जनता की अदालत सभा घेतली. त्या सभेत बोलताना केजरीवाल यांचे निष्ठावान सहकारी मानल्या जाणाऱ्या सिसोदिया यांनी जोरदार शाब्दिक टोलेबाजी केली. भगवान रामांसारखे केजरीवाल हुकूमशाहीरूपी रावणाशी लढत आहेत. तो लढा सुरू असेपर्यंत मी लक्ष्मणासारखा त्यांच्या समवेत उभा राहीन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राजकारणात सक्रिय होण्याआधी मी पत्रकार म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी २००२ यावर्षी मी ५ लाख रूपयांचे छोटे घर विकत घेतले. पुढील काळात माझ्या बँक खात्यात मी १० लाख रूपये जमवले. मात्र, ईडीने ते जप्त केले. माझा मुलगा महाविद्यालयात शिकतो. बँक खाते गोठवण्यात आल्याने मुलाची फी भरण्यासाठी मला इतरांपुढे हात पसरावे लागले, असा अनुभवही त्यांनी कथन केला.
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याबद्दल अटक करून मला तुरूंगात धाडण्यात आले. त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी माझे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू होते, असा दावाही सिसोदिया यांनी केला. मात्र, हास्यास्पद अशा शब्दात भाजपने तो दावा फेटाळून लावला. सिसोदिया यांची दीड महिन्यापूर्वी तुरूंगातून सुटका झाली. सुनियोजित कथानक रचून ते सांगत आहेत. ते नौटंकीसम्राट आहेत, अशी प्रतिक्रिया दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी दिली.





