Mohan Bhagwat : “आपली अपुरी तयारी भारताला विश्वगुरू बनण्यापासून थांबवत आहे..”; मोहन भागवत यांचं विधान चर्चेत !
भारताला मोठे होण्यापासून रोखण्यासाठी काही अंतर्गत व बाह्य शक्ती सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा इशाराही त्यांनी दिला.
Mohan Bhagwat – आज जागतिक संघर्ष आणि संकटांच्या काळात भारत जगाला सर्वसमावेशक उपाय देऊ शकतो. भारताची वेळ आता आली आहे.
मात्र आपल्याला विश्वगुरू बनण्यापासून रोखणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपली अपुरी तयारी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी केले.
नागपूर येथे आयोजित संघाच्या स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. ( Mohan Bhagwat)
इराण-अमेरिका संघर्षाचा दाखला देत भागवत म्हणाले की, ज्या देशांचा या युद्धाशी थेट संबंध नाही, त्यांनाही वाढत्या इंधन दरांचा फटका बसत आहे. जग केवळ शक्ती असणाऱ्यांचेच ऐकते. (Mohan Bhagwat)
सामर्थ्यवान देश मनमानी करतात आणि दुर्बलांना वाकावे लागते. त्यामुळे भारताला अत्यंत समृद्ध आणि सामर्थ्यवान बनवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
भागवत यांनी नमूद केले की, पर्यावरण संवर्धन आणि भौतिक विकास यांच्यात समतोल साधण्यात जग अपयशी ठरले आहे. यावर भारतच ‘धर्मा’च्या माध्यमातून सुवर्णमध्य साधणारा नवा मार्ग दाखवू शकतो. (Mohan Bhagwat)
मात्र, भारताला मोठे होण्यापासून रोखण्यासाठी काही अंतर्गत व बाह्य शक्ती सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा इशाराही त्यांनी दिला.
याप्रसंगी कुमार मंगलम बिर्ला यांनीही राष्ट्रीय आव्हानांच्या काळात नेहमीच देशासोबत खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल आरएसएसच्या कार्याचे कौतुक केले.






