नीलम गोऱ्हेंकडून शिंदे गटात सामील होण्याच्या वृत्ताचे खंडन, म्हणाल्या “मूळ शिवसेनेशी…”

मुंबई :– विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज शिवसेनेच्या शिंदे गटात सामील होण्याच्या वृत्ताचे पुन्हा एकदा खंडन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपली मूळ शिवसेनेशी बांधिलकी आहे आणि ती भविष्यातही कायमच राहील.
आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्या गटात जाणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण आपण लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना त्यांच्या मुंबई भेटीच्यावेळी भेटण्यासाठी गेलो होतो, आपण शिंदे यांना भेटण्यासाठी गेलो नव्हतो.
तेथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. तथापि त्यावरून नीलम गोऱ्हे या शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या, त्यात काहींही तथ्य नाही असेहीं त्यांनी म्हटले आहे. ओम बिर्ला यांना श्रद्धा वालकर प्रकरणात निवेदन देण्यासाठी आपण भेटलो होते असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.





