Aishwarya Narkar: ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’! ऐश्वर्या नारकरांचे 8 वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन
Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी भुमिकेविषयी व्यक्त केला आनंद

Aishwarya Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर तब्बल आठ वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन करत आहेत. आपल्या शाळेवर आणि विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम करणारी, मायेची ऊब आणि संस्कारांची शिदोरी देणारी शिक्षिका म्हणजेच नाईक बाई या भूमिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ असे या मालिकेचे नाव असून, येत्या १० ऑगस्टपासून सायंकाळी ६.३० वाजता ती पाहता येणार आहे.
नाईक बाई घर, संसार, जबाबदाऱ्या आणि आयुष्याने दिलेल्या अनेक परीक्षांचा समतोल साधत त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वासाची ज्योत पेटवत राहतात. स्वतःच्या अडचणी कधीही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू न देता, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी त्या अहोरात्र झटत असतात. स्वतःचं घर सांभाळतानाच शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचा त्यांचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे.
आईनंतर बाईंचे महत्त्वाचं स्थान
या भूमिकेविषयी ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “आठ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या कुटुंबात परतताना खूप आनंद होत आहे. ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही फक्त एक व्यक्तिरेखा नाही, तर आपल्या आयुष्यात भेटलेल्या त्या प्रत्येक शिक्षिकेचं प्रतिबिंब आहे, ज्या स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार न करता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी झटत असतात. नाईक बाईंचं विद्यार्थ्यांवरचं प्रेम, प्रत्येक मुलामध्ये उज्ज्वल भविष्य पाहण्याची त्यांची दृष्टी मला खूप भावली. आजही आपण सगळे आपल्या आयुष्यातील एखाद्या आवडत्या शिक्षकाला प्रेमाने आठवतो.
तसंच नातं नाईक बाई आणि प्रेक्षकांमध्ये निर्माण होईल अशी मला खात्री आहे. ही भूमिका साकारताना अनेकदा मला माझ्या स्वतःच्या शिक्षकांची आठवण होते. माझ्यासाठी म्हणाल तर आईनंतर बाई अर्थात आमच्या शिक्षिकांना महत्त्वाचं स्थान होतं. तेव्हा त्यांनी शिकवलेल्या बऱ्याच गोष्टी आजही लक्षात आहेत. आजही मी त्यांच्या संपर्कात आहे. माझ्या कार्यक्रमांना, नाटकांना माझ्या शाळेतल्या बाई आजही आवडीने येतात. त्यामुळेच नाईक बाई ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी खूप खास आहे,” म्हणत ऐश्वर्या यांनी भूमिकेविषयी आनंद व्यक्त केला.
ऐश्वर्या नारकर यांंच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्या सोशल मिडियावरही प्रचंड सक्रिय असतात.
हेही वाचा:
“आज तुमचा दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना…”; अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची डोळे पाणवणारी पोस्ट





