“आज तुमचा दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना…”; अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची डोळे पाणवणारी पोस्ट
Sunetra Pawar Post : अजितदादांच्या निधनानंतर ही पहिलीच जयंती असल्याने कुटुंबासह कार्यकर्ते भावुक

Sunetra Pawar Post : उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांची आज पहिली जयंती आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार, जय पवार देखील उपस्थित होते. आजच्या या दिवशी सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
अजितदादांच्या निधनानंतर ही पहिलीच जयंती असल्याने कुटुंबासह कार्यकर्त्यांमध्येही अत्यंत भावूक वातावरण पाहायला मिळत आहे. ‘आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत,’ असे म्हणत पोस्टद्वारे सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुनेत्रा पवार यांची पोस्ट-
“दादा…एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. घर, कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा. पण आज तुमचा हाच दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा…आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ…आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही,” असे सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे.
दादा…
एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला…
घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा..
पण आज तुमचा हाच दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.
हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही… pic.twitter.com/GZ6sxbQdzO— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) July 22, 2026
पुढे त्यांनी लिहिले, “काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील…माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम…,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
हेही वाचा:





