Otur Leopard Catch : ओतूरमध्ये वनविभागाची मोठी कारवाई! गाढवेपटचा ‘दहशतखोर’ बिबट्या अखेर जेरबंद
Otur Leopard Catch : ओतूर परिसरातील गाढवेपट येथे वनविभागाचा अचूक सापळा; दीड वर्षाची बिबट मादी पिंजऱ्यात अडकल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान.

Otur Leopard Catch – ओतूर परिसरातील गाढवेपट येथे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेली बिबट मादी अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे. गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही मादी पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
ओतूर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांकडून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाने गाढवेपट परिसरात पिंजरा लावला होता. गुरुवारी पहाटे बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. एम. बुट्टे, वनरक्षक के. एस. खरोडे आणि किसन केदार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
जेरबंद झालेली बिबट मादी अंदाजे १ ते दीड वर्षे वयाची असून, तिला वैद्यकीय तपासणीसाठी आणि पुढील देखरेखीसाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे सुरक्षितपणे पोहोच करण्यात आले आहे. परिसरातील इतर बिबट्यांच्या वावराबाबतही वनविभाग सतर्क असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





