Otur Accident – अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर ओतूर येथील हॉटेल वायकर्स जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका ५५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली आहे. दत्तात्रेय लक्ष्मण अल्हाट (रा. ओतूर, ता. जुन्नर) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ओतूरकडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्ताला उपचारासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत. अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर आळेफाटा ते ओतूर आणि ओतूर ते पारगाव फाटा या दरम्यान अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. महामार्गावर पडलेले खड्डे आणि त्यातून वाहने चालवताना चालकांची होणारी कसरत, तसेच महामार्गालगत असलेल्या गावांजवळील गर्दी यामुळे हे अपघात घडत आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अनेक निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. महामार्ग विभागाने या ठिकाणी तत्काळ उपाययोजना कराव्यात आणि वाहनांच्या वेगावर मर्यादा आणावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.