Vasant More । Atharva Sudame । Pune news : मनसे पक्षाला रामराम ठोकल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुनज आघाडीच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढविली. मात्र यात त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर दि. ९ जुलै २०२४ रोजी वसंत मोरे यांनी जाहीररित्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.
वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांची प्रत्येक पोस्ट नेहमीच ते चर्चेत असते.
दरम्यान, अश्यातच वसंत मोरे यांच्या एका फेसबुक पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. वसंत मोरेंनी आपल्या पोस्टमधून कोणत्याही राजकीय नेत्याला नाही तर, चक्क सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘अथर्व सुदामे’ याला टार्गेट केल्याचं दिसून आलं आहे. अथर्वनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाच्या गोष्टीवर भाष्य करत विनोदी स्वरूपाचा व्हिडिओ तयार केला आहे.
या व्हिडिओत त्याला काही व्यक्ती पुण्यातील प्रमुख ठिकाणांचा पत्ता विचारताना दिसतात, त्यावर अथर्व त्याच्या गमतीशीर स्टाईलने उत्तर देत असल्याचं दिसून येत. मात्र, आता हाच व्हिडिओ वसंत मोरे यांचा खटकला आहे.
यावर वसंत मोरे म्हणतात की, “मला कधी कधी या सुदामेचा इतका राग येतो की असं वाटते की हा रिल करून याचे पोट भरतो खरे पण यात हा आम्हा पुणेकरांच्या इज्जतशी खेळतो सुदामे तुला एकच सांगणे आहे तू जर खरा पुणेकर असशील तर पुणेकरांच्या इज्जत बरोबर खेळणे बंद कर नाहीतर एकदिवस तुझ्याकडे निवांत वेळ काढून पहावे लागेल..’ असं वसंत मोरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले असून, अनेकांनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिकिया दिल्या आहेत.