“…अन्यथा गोळ्या घालू” वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

पुणे – मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील कात्रज कोंढवा भागाचे प्रतिनिधित्व करणारे वसंत मोरे हे मनसेचे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुलगा रुपेश मोरे याला खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी आल्याचे समोर आले आहे.
वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून ३० लाख रुपयांची खंडणी अज्ञातांनी मागितली आहे. सोबतच खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
वसंत मोरे यांचा मुलगा रुपेशचे बनावट विवाह सर्टिफिकेट महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करत 30 लाख रुपयाची खंडणी मागितली आहे. हे पैसे पुण्यातील खराडी येथील इऑन आयटी पार्कजवळ थांबलेल्या इनोवा कारमध्ये ठेवा, असा व्हॉट्सअपवर मेसेज आला. तसेच, खंडणी दिली नाही तर बनावट विवाह सर्टीफिकेट विविध मोबाईलवरून व्हायरल करण्याचा इशारा देऊन गोळ्या घालण्याचीही धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी देखील मिळाली होती धमकी
रुपेश मोरे याला यापूर्वी देखील धमकी आली होती. अज्ञाताने चिट्ठी लिहून रुपेशला जीवे मारण्याची धमकी दिली होती. जून २०२२ दरम्यान हा प्रकार घडला होता. यानंतर वसंत मोरे यांनी पोलिसात तक्रार दाखल करत कायदेशीर कारवाईची मागणी केली होती.





