पुणे जिल्हा | संस्था चालक शिक्षण मंडळाच्या तिसऱ्या अधिवेशनाचे आयोजन

मंचर, (प्रतिनिधी) – संस्था चालक शिक्षण मंडळ, पुणे ग्रामीण संस्थेचे तिसरे वार्षिक अधिवेशन व आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभ अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कवयित्री शांता शेळके सभागृहात १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजित केला आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहर यांनी रविवार, दि.२९ रोजी दिली.
संस्था चालक शिक्षण मंडळ, पुणे ग्रामीण संस्थेचे तिसरे वार्षिक अधिवेशन व आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभ संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रम संदर्भात माहिती देण्यासाठी मंचर येथील शरद बँकेच्या सभाग्रहात पत्रकार परिषद संपन्न झाली.
यावेळी अधिवेशनाचे संयोजक आणि भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संस्था संस्थाचालक शिक्षण मंडळाचे सहसचिव महेश ढमढेरे, सचिन भोर, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक विलास लबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते व संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला संस्था चालक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय कोलते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रदीप वळसे पाटील आणि महेश ढमढेरे यांनी दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्था महामंडळाचे विभागीय अध्यक्ष गणपतराव बालवडकर, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर,
प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे आदी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे संयोजन आंबेगाव तालुक्यातील संचालक प्रदीप वळसे पाटील, जयसिंग काळे व पदाधिकारी व संचालकांनी केलेले आहे.
संस्था चालक शिक्षण मंडळाच्या पुरस्कारप्राप्त शाळा पुढीलप्रमाणे: आंबेगाव- जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल चिंचोली (को.), बारामती- श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, भोर- राजा रघुनाथराव विद्यालय, दौंड- श्री गोपीनाथ विद्यालय वरवंड,
हवेली पुरोगामी विद्यालय सोरतापवाडी, इंदापूर- श्री छत्रपती हायस्कूल सणसर, जुन्नर- रा. प. सबनीस विद्यालय नारायणगाव, खेड ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळदी देवाची,
मावळ- नविन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे, मुळशी- सेनापती बापट विद्यालय माले, पुरंदर- पुरंदर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज सासवड, शिरूर- स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बो गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे,
राजगड- सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आंबवणे, आंबेगाव शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय डिंभे (आदिवासी विभाग), शिवशंकर विद्यालय, तळेघर (आदिवासी विभाग), आंबेगाव- (विशेष पुरस्कार) संत ज्ञानेश्वर विद्यालय चास.





