Satara Rain : सातारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट! कोयना धरण परिसरात 24 तासात 174 मिलिमीटर पावसाची नोंद
Satara Rain : गेल्या पंधरा दिवसात तिसऱ्यांदा दिवशी घाटात दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे. दिवशी घाटातील दत्त मंदिर परिसरात एका झाडासह दरड कोसळली आहे. तर सुतारवाडी येथे दरड कोसळली आहे.

कराड : सातारा जिल्ह्याला आज, दि. ३१ हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असून पश्चिम घाट परिसरासह पूर्वेकडे अनेक तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कोयना धरणात गेल्या २४ तासात प्रति सेकंद २५ हजार क्युसेस पाण्याची आवक सुरू असून २.१६ टीएमसी एवढा पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणात एकूण ८६.११ टीएमसी एवढा पाणीसाठा साठला असून तो नियंत्रित करण्यासाठी धरणातून सध्या ६ हजार १२९ क्युसेस प्रति सेकंद पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.
यामुळे कोयना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी पातळीत वाढ होऊ लागले आहे. पाटण तालुक्यातील दिवशी घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली असल्याने ढेबेवाडी- नवारस्ता हा मार्ग वाहतूकीसाठी बंद झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात तिसऱ्यांदा दिवशी घाटात दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे. दिवशी घाटातील दत्त मंदिर परिसरात एका झाडासह दरड कोसळली आहे. तर सुतारवाडी येथे दरड कोसळली आहे.
साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला असून नदी, नाले, अोढे भरून वाहू लागले आहेत. कोयना नदीवरील जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला आहे. तर पाटण शहराजवळील मुळगाव पूलाला पाणी टेकले असून काही वेळात पूलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. कुसवडे येथे एका घराची संरक्षक भिंत कोसळली आहे. तर लुगडेवाडी, नेरळे- मोरगिरी रस्त्यावर पाणी आले आहे.





