भारत -अमेरिका कराराबाबत आशावाद; शेअर निर्देशांक वाढले

मुंबई : बर्याच दिवसांच्या ताण-तणावानंतर अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी भारतात आले आहेत. भारतीय वाणिज्य मंत्रालयातील अधिकार्यांबरोबर त्यांची चर्चा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांदरम्यानचा व्यापारातील तणाव निवळेल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. यामुळे मंगळवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी होऊन निर्देशांक उंचावले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 594 अंकांनी वाढून 82,380 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 169 अंकांनी म्हणजे 0.68 टक्क्यांनी वाढून 25,239 अंकावर बंद झाला. दरम्यान अमेरिका 17 सप्टेंबर रोजी व्याजदरात कपात करण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून अमेरिकेसह जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. याचाही निर्देशांकांना आधार मिळाला.
कोटक महिंद्रा बँक, लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा, मारुती, भारती एअरटेल, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकाला आधार मिळाला. एशियन पेंट्स, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. मात्र आता निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार नफेखोरी करण्याची शक्यता वाढली असल्याचे सांगितले जाते.
जिओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिका या आठवड्यात किमान पाव टक्के व्याजदर कपात करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील तीन महिन्यात आणखी व्याजदर कपात केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्यामुळे शेअर बाजारात उमेदीचे वातावरण निर्माण झाले आहे. 22 सप्टेंबरपासून जीएसटी कपातीची अंमलबजावणी होणार आहे. अशा परिस्थितीत ग्राहक वस्तू आणि वाहन क्षेत्राचे निर्देशांक वाढत आहेत. एफएमसीजी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्राची निर्देशांक वाढले.
अमेरिकेने व्याजदर कपात केल्यानंतर आणि भारत अमेरिकेचे व्यापारी संबंध सुधारल्यानंतर परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतामध्ये खरेदी वाढविण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात या गुंतवणूकदारांनी कमी विक्री केली. मात्र सोमवारी या गुंतवणूकदारांनी 1,268 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. जर हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराकडे परतले तर निर्देशांकांना बराच आधार मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





