Ashish Shelar : ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाला विरोध कायम; आशिष शेलार आक्रमक, सेन्सॉर बोर्ड मोठा निर्णय घेणार?

Ashish Shelar : मुंबईत काल महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार 2025 मोठ्या उत्साहात पार पडला. पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त करत पुरस्कार दिल्याबदल आनंद व्यक्त केला. मात्र, या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.
यामुळे कार्यक्रस्थळी काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना काही लोकांना या सिनेमाच्या विरोधात घोषणाबाजी केली. ज्यामुळे मुखमंत्र्यांना भाषण काही वेळासाठी थांबवावं लागलं. आता या प्रकरणी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री आशिष शेलार यांनी सेन्सार बोर्डाला चित्रपटाच्या प्रमाणपत्राचा फेरविचार करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी चित्रपटाची स्क्रिप्ट तपासली गेली होती का, कोणी परवानगी दिली, की यामागे खोडसाळपणा होता, याची चौकशी करण्याचे आदेश शेलार यांनी दिले आहेत. यामुळे आता ‘खालिद का शिवाजी‘ या चित्रपट प्रदर्शनावर बंदीचे ढग दाटून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यभरात हिंदू महासंघ आणि हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटात खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप केला आहे.
आरोप काय?
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये शिवाजी महाराजांचे सैन्य 35% मुस्लिम होते आणि रायगडावर मशीद बांधली होती, असा दावा करण्यात आला आहे. ऐतिहासिक पुराव्यांशिवाय हा दावा केल्याना आरोप संघटनांनी केला आहे. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्याचे देखील बोलले जात आहेत.
हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित न करण्याचा आक्रमक पवित्रा हिंदू संघटनांनी घेतला असून, जर कोणी चित्रपट प्रदर्शित केला तर थेट तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हिंदू महासंघाने सेन्सॉर बोर्डाला पत्र पाठवून चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे.
कार्यक्रमावेळी काय घडलं?
“इतिहासाचं विकृतीकरण थांबवा,” अशी मागणी आंदोलकांनी पुरस्काराच्या कार्यक्रमात केली. आंदोलकांनी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले भाषण थांबवून आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. “तुमचे म्हणणे ऐकले आहे, पण आता कृपया कार्यक्रमात व्यत्यय आणू नका,” असे फडणवीस म्हणाले.
अनेक फिल्म फेस्टीव्हलची वारी
‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाने अनेक फिल्म फेस्टीव्हलची वारी केली असून, समीक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा चित्रपट 8 ऑगस्टला रिलीज होणार आहे. मात्र, चित्रपटाला वाढता विरोध पाहता हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही हे पाहणे महत्वाचे असणार आहे. याशिवाय या प्रकरणी सेन्सॅार बोर्ड काय निर्णय घेणार हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा : शेअर बाजारावर दबाव ; अमेरिकेच्या टॅरिफच्या भीतीने सेन्सेक्स, निफ्टीत घसरण





