Maharashtra State Film Awards : मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ; ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाला विरोध, आंदोलकांची नेमकी मागणी काय?

मुंबई : महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान अचानक गोंधळ उडाला. ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाला तीव्र विरोध करत दोन आंदोलकांनी घोषणाबाजी केली. “इतिहासाचं विकृतीकरण थांबवा,” अशी मागणी करत त्यांनी सोहळ्याचे वातावरण ढवळून काढले. आंदोलकांनी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.
घटनेच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले भाषण थांबवून आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. “तुमचे म्हणणे ऐकले आहे, पण आता कृपया कार्यक्रमात व्यत्यय आणू नका,” असे सौम्यपणे सांगत त्यांनी परिस्थिती हाताळली. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आंदोलकांना ताब्यात घेतले. कार्यक्रमानंतर आंदोलकांनी माध्यमांना सांगितले, “मुख्यमंत्र्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, ते यावर योग्य कारवाई करतील.”
आंदोलकांचा नेमका आक्षेप काय?
आंदोलकांनी ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, चित्रपटात तीन चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. विशेषत: “शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35 टक्के मुस्लिम सैनिक होते,” असा दावा चित्रपटात आहे, जो खरा नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
तसेच, “रायगडावर मशीद होती,” असे दाखवणेही चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलकांनी आपल्या मागण्यांसह बॅनर आणि पोस्टरद्वारे निदर्शने केली. मात्र, हे आंदोलक कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिस तपासातून याबाबत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे.
‘खालिद का शिवाजी’ चित्रपट नेमका काय आहे?
‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट एका मुस्लिम मुलाच्या दृष्टिकोनातून सादर केला आहे, जो मराठी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना विविध प्रश्नांना सामोरे जातो. चित्रपटाच्या ट्रेलरनुसार, हा मुलगा आपल्या आजीला प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करतो. मात्र, या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे, ज्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.





