Pune Gramin : शिरूर तहसीलदारांच्या आदेशाला विरोध; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर : शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील एका वादग्रस्त रस्त्याच्या खुल्या वापराबाबत तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाला स्थानिक चार व्यक्तींनी थेट विरोध दर्शवून प्रशासनालाच आव्हान दिले आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी प्रमिला नागेश वानखेडे (वय 42, व्यवसाय – तलाठी, रा. खराडी बायपास, ता. हवेली, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ताराबाई पोपट भोईटे, खंडू पोपट भोईटे, महेश पोपट भोईटे, दादा पोपट भोईटे (सर्व रा. शिरसगाव काटा, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, २८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मौजे शिरसगाव फाटा ते पिंपळसूटी या रस्त्याच्या तात्पुरत्या खुल्या वापरासंदर्भात तहसीलदार यांनी स्पष्ट आदेश दिला होता. त्यानुसार फिर्यादी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपीना रस्ता खुला करण्याची विनंती केली. मात्र, आरोपींनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाच्या आदेशास विरोध केला होता.
त्यावेळी आरोपी खंडू भोईटे याने उघडपणे सांगितले की, “आम्ही कोणाचाही आदेश पाळणार नाही. आमची जमीन मोजणी होईपर्यंत आम्ही रस्ता मोकळा करणार नाही. तुम्हाला काय ते गुन्हा दाखल करा.” यावेळी इतर आरोपींनीही यास दुजोरा दिला. या प्रकारामुळे तहसीलदारांच्या आदेशाचा थेट अवहेलना झाल्याने, संबंधित चार जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शिंदे तपास करत असून या प्रकरणाच्या तपासासाठी प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजाळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रशासनाचे आदेश न पाळल्यास कायदेशीर कारवाई कशी होऊ शकते, याचे ठोस उदाहरण निर्माण झाले आहे. शासकीय आदेशांना विरोध करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध पोलीस यंत्रणा तत्पर आहे, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.




