जामखेड – महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षाने मांडलेली सूचना अखेर मागे घेण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच 26 मार्च 2025 रोजी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभापतींना पत्र सादर करून हा निर्णय जाहीर केला. या पत्रावर दानवे यांच्यासह एकनाथराव खडसे, अनिल परब, भाई जगताप, अभिजित वंजारी, सचिन अहिर, सुनिल शिंदे, राजेश राठोड, प्रज्ञा सातव आणि जगन्नाथ अभ्यंकर या विधानपरिषद सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. चर्चेनंतर समाधान, सूचना मागे – विरोधी पक्षाने 19 मार्च 2025 रोजी सभापतींविरोधात सूचना मांडली होती. सभागृहात दोन्ही बाजूंनी तीव्र भावना व्यक्त झाल्या होत्या आणि काही प्रसंगांमुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांचे हक्क डावलले जात असल्याचा आरोप होता. यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी सभापतींना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव आणला गेला. मात्र, 21 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेत सर्व मुद्द्यांवर समाधानकारक आश्वासन मिळाल्याने विरोधी पक्षाने आपला निर्णय बदलला. “सभागृहात खेळीमेळीचं वातावरण रहावं” – “सभागृहात खेळीमेळीचं वातावरण कायम रहावं आणि लोकशाहीच्या या पवित्र मंदिराचा सन्मान राखला जावा, यासाठी आम्ही सभापतींविरोधातील सूचना मागे घेत आहोत,” असं अंबादास दानवे यांनी पत्रात नमूद केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे विरोधी पक्षाला समाधान मिळालं असून, सभागृहातील तणाव निवळण्यास मदत झाली.