विरोधी पक्षांनो उभारी घ्या (अग्रलेख)

देशातील महत्त्वाचे राज्य असलेल्या महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना “सत्ताधारी जोमात आणि विरोधक कोमात’ अशी जी स्थिती राज्यात दिसत आहे ती लोकशाही राजकारणाला निश्‍चितच भूषणावह नाही. सध्या सत्तेत असलेल्या भाजपाला आपल्या विरोधात कोणीही सक्षमपणे उभे राहू शकत नाही याची जवळजवळ खात्री झाली आहे. रविवारी साताऱ्यात ही बाब प्रकर्षाने समोर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा साताऱ्यात आली होती तेव्हा फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा तलवार देऊन गौरव करण्यात आला. या तलवारी स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी मार्मिक टिप्पणी करताना राज्यात लढायला विरोधकच शिल्लक नसल्याने या तलवारी आम्ही वर्षा बंगल्यावर ठेवून देतो, असे म्हटले होते.

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या नेत्यांनी हे विधान केले आहे हे लक्षात घ्यायला हवे. कारण जेव्हा साऱ्या भारतात नरेंद्र मोदी यांची लाट होती तेव्हाही सातारा जिल्हा संपूर्णपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या पाठीशी उभा होता. गेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला या जिल्ह्यात यश मिळाले नव्हते. शेजारच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही भाजप आणि शिवसेना यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या अस्तित्वाला आव्हान दिले होते; पण संपूर्ण राज्यात फक्‍त सातारा जिल्ह्यात या दोन पक्षांचे संपूर्ण अस्तित्व टिकून होते आणि आता हा बालेकिल्ला ढासळण्याच्या बेतात असल्यानेच निवडणुकीत समोर लढायला विरोधकच शिल्लक नसल्याचे उद्‌गार चंद्रकांत पाटलांना काढावे लागले आहेत.

त्याची दखल घेऊन विरोधी पक्षांनी आता पेटून उठून निवडणुकीत आव्हान उभे करण्याची गरज आहे. सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तीन महिन्यांतच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यापूर्वी त्यांचे चुलतबंधू श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता या जिल्ह्यात भाजपचा मोठा शिरकाव अपरिहार्य आहे. राष्ट्रवादीचा सातारा हा बालेकिल्ला ढासळू देणार नाही, अशी घोषणा पक्षाचे नेते करीत असले तरी हे काम सोपे नाही याची जाणीव त्यांना आहे.

भाजपने मेगाभरतीच्या प्रयोगाखाली विशिष्ट नेत्यांना पक्षात घेण्याचा सपाटा लावल्याने विरोधकांना काय करावे हेच सुचेनासे झाले आहे. कोल्हापुरात आधीच शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे भाजपचे राज्यसभा सदस्य आहेत. कागलचे घाटगे घराणेही भाजपमध्ये आहे. या सर्व नेत्यांना राज्यात ग्लॅमर आणि मोठा मान आहे त्याचा फायदा भाजपला होणार हे उघड आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे मनोधैर्य अधिकच खचले आहे. राजघराण्यांशी संबंधित नेत्यांशिवाय भाजपने राजकारणातील काही महत्त्वाची घराणीही आपल्याकडे ओढल्याने तेथेही विरोधकांची पंचाईत झाली आहे.

मोहिते पाटील, विखे पाटील, पद्मसिंह पाटील, मधुकरराव पिचड अशी अनेक प्रभावशाली घराणी भाजपमध्ये आल्याने त्या भागात विरोधी पक्षांना फटका बसला आहे. म्हणूनच भाजप आणि शिवसेना या पक्षांमध्ये होत असलेले स्थलांतर थांबवणे सोपे नसले तरी आता आहे त्या सैन्यानिशी विरोधकांना कडवी लढत द्यावी लागेल. छत्रपती आणि सरदार जरी पक्ष सोडून गेले असले तरी मावळ्यांच्या साथीने आम्ही लढत देऊ, अशी घोषणा धनंजय मुंडे यांनी केली होती. ती घोषणा गांभीर्याने घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची गरज आहे. विरोधकांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा भाजपचा डाव लक्षात घेऊनच विरोधी पक्षांना रणनीती आखावी लागेल.

निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्‍यता असल्याने आता विरोधी पक्षांना उभारी घ्यावीच लागेल. राज्यात चर्चेत असलेली प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी त्यामानाने नियोजनात खूपच पुढे आहे. एमआयएमबाबत असलेली आघाडी तोडल्यानंतरही वंचित बहुजन आघाडी संपूर्णपणे इलेक्‍शन मोडमध्ये आहे; पण तेवढा उत्साह आणि नियोजन अजूनही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस दाखवत नाहीत हेच दुर्दैव आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करण्याबाबतही आता नकारघंटाच वाजू लागली आहे.

साहजिकच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांना आता आपल्या पारंपरिक पद्धतीनेच एकमेकांच्या साथीने निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागेल. शेकाप, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी संघटना अशा काही पक्षांची मोट बांधावी लागेल. खरेतर लोकसभा निवडणुकीत या पक्षांनी ज्या राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा आणि करिष्म्याचा प्रचारात उपयोग करून घेतला होता त्या राज ठाकरे यांच्या मनसेशी आघाडी करण्याचाही या पक्षांचा विचार नाही हे उघड झाले आहे. स्वतः राज ठाकरे यांनी आपला पक्ष निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट केले नाही. ज्या पक्षाचे एकेकाळी 13 आमदार विधानसभेत होते तो मनसे सारखा पक्षही सध्या संभ्रमावस्थेत असेल तर परिस्थिती अवघड आहे. विरोधी पक्षांची वैयक्‍तिक आणि आघाडी म्हणूनही तयारी झाल्याचे कोठेच दिसत नाही.

लोकसभा निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षांनी चांगली वातावरणनिर्मिती केली होती. त्याचा काहीच फायदा न झाल्याने कदाचित विरोधी आघाडी नकारात्मक मोडमध्ये गेली असावी; पण आता निवडणूक तोंडावर आली असताना भूतकाळ विसरून त्यांना कामाला लागावे लागेल. सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष हे जिवंत लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. आम्ही शंभर टक्‍के पुन्हा सत्तेवर येणार हा सत्ताधारी पक्षाचा आत्मविश्‍वास लोकशाहीसाठी काही प्रमाणात धोकादायक आहे. एखाद्या क्रीडा स्पर्धेतील सामन्याप्रमाणे विरोधी पक्षांनी अजिबात लढण्याचा प्रयत्न न करता समोरच्याला बाय देणे लोकशाहीसाठी घातक आहे. जो भाजप सध्या फुल फॉर्मात आहे त्याच भाजपचे एकेकाळी फक्‍त दोन सदस्य लोकसभेत होते आणि देशातील कोणत्याही राज्यात सत्ता नव्हती हे उदाहरण समोर ठेवूनच विरोधकांना आता काम करावे लागेल. निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वीच पराभव मान्य करण्याऐवजी विरोधी पक्षांनी पुन्हा त्वेषाने उभारी घेऊन मैदानात उतरण्याची गरज आहे. मतदार शहाणा आहे, तो योग्य निर्णय घेतो हे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही विसरता कामा नये.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here